नागपूर - राज्य सरकारने कोरोनासंदर्भात नवी नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये रेड झोन व बिगर रेड झोन अशी विभागणी केली असून नागपूरला रेड झोनमधून वगळण्यात आले आहे. असे असले तरी नागपूरात कोरोनाचा धोका टळला नसून १७ मे रोजी जारी केलेल्या पूर्वीच्याच नियमांचे पालन होणार असल्याचे नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे.
'रेड झोनमधून वगळण्यात आले असले तरी, नागपूरला धोका कायम' - नागपूर कोरोना अपडेट
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने रेड झोन व बिगर रेड झोन अशी विभागणी केली असून शिथिलतेसंदर्भात नवीन नियमावली जारी केली आहे. मात्र, या आदेशाची अंमलाबजावणी २२ मेपासून केली जाणार असल्यामुळे नागपूर अद्याप रेड झोनमध्येच असल्याचे नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे.
राज्य सरकारने जारी केलेल्या नव्या नियमावलीनुसार नागपूर हे कोरोनाच्या रेड झोनमधून वगळण्यात आले आहे. परंतु नागपुरात मागील ३ दिवसांत ३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून नागपूरात कोरोनाचे हॉटस्पॉट अजूनही आहेत. त्या हॉटस्पॉटमधील रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे नागपूरवरचे कोरोना संकट अजूनही टळलेले नाही. ही बाब राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिली जाईल असे, असे मुंढे म्हणाले.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जे नियम जारी करण्यात आले आहेत. ते २२ मेपर्यंत तसेच कायम राहणार असल्याचेही तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. यासोबतच, २२ मेनंतर परिस्थिती पाहता नवे दिशानिर्देश जारी करण्यात येईल, असेही मुंढे म्हणाले.