नागपूर - नागपुरात दैनंदिन रुग्णसंख्या वाढीवर नियंत्रण न आल्याने मिनी लॉकडाऊनमध्ये 14 मार्चपर्यंत वाढ करण्यात आली आहे. यात शनिवार, रविवार हे दोन दिवस शहरात अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न निघण्याचे तसेच, या काळात स्वयंशिस्त पाळून सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.
बंदमुळे गजबजलेल्या परिसरात शुकशुकाट; मात्र, रुग्णसंख्येत वाढ मागील आठवड्यात मिनी लॉकडाऊनमध्ये बाजारपेठा बंद होत्या. यात अत्यावश्यक सेवांमध्ये दूध, भाजीपाला, फळे विक्रेत्यांची दुकाने सुरू असणार आहेत. शहरातील मोठी बाजारपेठ असणाऱ्या परिसरांत नागरिकांनी बंदला प्रतिसाद दिल्यामुळे गांधी बाग, अग्रसेन चौक या गजबजलेल्या परिसरात शुकशुकाट पाहायला मिळत आहे. या बाजारपेठा एरवी प्रचंड गर्दी असते. यात शनिवार, रविवारी या गर्दीत आणखी वाढ होते. बंद असल्याने ही गर्दीसोबतच कोरोनाचा संसर्ग रोखण्यात येत आहे. पण रुग्णसंख्या वाढत असल्याने अद्याप अडचणीची स्थिती आहे.
व्यापारी वर्गाकडून बंदला प्रतिसाद
शहरात काही भागात वर्दळ कायम असली तरी, मोजकेच लोक रस्त्यावर दिसून येत आहे. नागरिकांवर प्रशासनाची जोर जबदरदस्ती नसली तरी सर्व शासकीय खाजगी कार्यालये बंद असल्याने नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरणे टाळावे, असे आवाहन केले जात आहे. यात बाजारपेठा बंद ठेवत व्यापारी वर्गाकडून बंदला प्रतिसाद दिला जात आहे. यामुळे शहारातील नागरिकांनीही याला प्रतिसाद देत घरात राहून कोरोनाच्या नियमाचे पालन करा असेच सांगितले जात आहे.
रुग्णसंख्या नियंत्रणात न आल्यास निर्बंध अधिक कठोर होण्याची शक्यता
कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी दररोज 11 हजारपेक्षा जास्त लोकांची कोरोना चाचणी केली जात आहे. यामुळे प्रशासनाला रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी एक आठवडा मिळाला आहे. या दरम्यान दैनंदिन मिळणाऱ्या नवीन कोरोना बधितांची रुग्णसंख्या कमी न झाल्यास आणखी कठोर पावले प्रशासनाला उचलावे लागू शकतात. यामुळे नागरिकांनी त्रिसूत्रीचे पालन करत नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून कोरोनाला अटकाव करण्यास सहकार्य करणे गरजेचे आहे.