नागपूर -नागपूर महानगर पालिका निवडणुकीच्या ( NMC Election ) दृष्टीने भारतीय जनता पक्षाने ( Bjp Nagpur ) जोरदार तयारी सुरू केली आहे. विद्यमान नगरसेवकांच्या पाच वर्षातील कामाचा रिपोर्ट कार्ड ( NMC Bjp Corporator Report Card ) तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. शहरात केलेल्या विकासाच्या मुद्यावरच भाजप या निवडणुकीत उतरणार असल्याचं जवळजवळ निश्चितचं मानलं जातं आहे. त्यामुळे पाच वर्षात नगरसेवकांनी केलेल्या विकास कामांचे मूल्यांकन करण्यासाठी भाजपने अंतर्गत सर्व्हे सुरू केला आहे. एकूण पाच मुद्यावर सर्व्हे करण्यात येत आहे. भाजपचे जे विद्यमान नगरसेवक या सर्वेत पास होतील त्यांनाच पुन्हा संधी मिळणार असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे.
येत्या काळात नागपूरसह राज्यातील दहा महानगरपालिकेच्या निवडणूका होऊ घातलेल्या आहेत. गेल्या 15 वर्षांपासून नागपूर महानगर पालिकेत भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता आहे. भाजप शिवसेना युती सरकारमध्ये नागपूरला सत्ताकेंद्र म्हणून सुद्धा ओळख मिळाली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपचे दोन दिग्गज नेते नागपूरचं प्रतिनिधित्व करतात. एवढंच नाही तर नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय देखील आहे. त्यामुळे नागपूर मनपावर सत्ता मिळवणे भाजपसाठी अस्तित्त्वाची नाही तर सन्मानाची लढाई असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत भाजप ही निवडणूक हलक्या घेणार नाही असंच चित्र निर्माण झाले आहे.