नागपूर -नागपुरात 7 डिसेंबरपासूनहिवाळी अधिवेशन घेतले जाणार आहे. त्यासंदर्भात तयारींना वेग आला आहे. मात्र, मंत्रिमंडळ बैठकीत नागपुरात अधिवेशन घेण्यास अनेक मंत्र्यांनी विरोध केला आहे. एकीकडे तयारी जोरात सुरू असताना यंदाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचा आग्रह मंत्र्यांनी धरल्यानंतर आज (शुक्रवारी) नागपुरच्या विधानमंडळ परिसरात कामकाज सल्लागार समितीची बैठक घेण्यात आली.
यामध्ये विविध यंत्रणांनी आवश्यक तयारी पूर्ण करावी, अशा सूचना महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी केली आहे. यावेळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात असलेली कोरोना परिस्थिती यासह अनेक मुद्यांवर चिंतन करण्यात आले. एकूण स्थितीचा आढावा घेतल्यानंतर यासंदर्भात अंतिम निर्णय मुंबईत घेतला जाणार आहे.
हिवाळी अधिवेशन नागपूरात घ्यावे की मुंबईत? यासंदर्भातील निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या पुढच्या बैठकीत घेण्यात येणार आहे. हिवाळी अधिवेशनासाठी दरवर्षी प्रमाणेच आवश्यक व्यवस्था राहणार असली तरी कोविडच्या पार्श्वभूमीवर या व्यवस्थेमध्ये आवश्यक बदल करण्यात येणार आहे. मुंबई येथे झालेल्या अधिवेशनाप्रमाणे विधानभवन परिसरातच कोरोना चाचणीची व्यवस्था केली जाणार आहे. अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच विधिमंडळात प्रवेश देण्यात येणार असल्याने आरोग्य विभागातर्फे आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करण्यासंदर्भांत सूचना करण्यात आल्या आहेत.