नागपूर -म्युकरमायकोसीस अर्थात 'ब्लँक फंगस' सोप्या भाषेत काळ्या बुरशीचे (म्युकरमायकोसीस) अनेक रुग्ण जिल्ह्यात आढळून येत आहे. त्यामुळे कोरोना झाल्यानंतर अनेकांना या आजाराने ग्रासले आहे. शहर व ग्रामीण भागातून येत असलेल्या रुग्णांवर योग्य ती उपचार पद्धती निश्चित व्हावी, ग्रामीण भागातील खासगी व सरकारी दवाखान्यातील सर्व वैद्यकीय कर्मचारी त्यादृष्टीने प्रशिक्षित व्हावे, या आजाराचे जनप्रबोधन व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तज्ज्ञ डॉक्टर व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. आजच्या बैठकीमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांनी म्युकरमायकोसीस संदर्भात जिल्ह्यामध्ये किमान 300 ते 350 रुग्ण पुढे आल्याचे सांगितले. यामध्ये जिल्ह्यातील नाक, कान, घसा तज्ज्ञ (इएनटी असोशिएशन), दंत्त तज्ञ (डेंटीस्ट), नेत्र तज्ज्ञ (आय स्पेशालिस्ट), डॉक्टर संघटनांचे प्रतिनिधीदेखील उपस्थित होते.
राज्य सरकार म्युकरमायकोसीसच्या लसींची खरेदी करणार -
आजच्या बैठकीत म्युकरमायकोसीस संदर्भात ग्रामीण भागातील जनतेला सोप्या शब्दांमध्ये समजेल तसेच उपचार पद्धत व आजाराबद्दलची माहिती सहज उपलब्ध होईल, असे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टरांनी ग्रामीण भागातील खासगी डॉक्टरांना तसेच अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या व वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना या संदर्भातील मार्गदर्शन करण्याबाबतच्या सूचना केल्या. राज्य सरकार यासाठी आवश्यक असणाऱ्या लसीची खरेदी करणार आहे. त्यामुळे तूर्तास या संदर्भातील उपलब्ध असणाऱ्या काही लसींचा तुटवडा जिल्ह्यात निर्माण झाल्याची माहिती आहे. अन्न व औषधी प्रशासनाच्या अधिकारी तसेच महसूल विभागातील लसीकरणाची जबाबदारी असणाऱ्या अधिकाऱ्यांना अशा पद्धतीचा काळाबाजार कोणी करत असेल, तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये कोरोना अधिक असणाऱ्या गावांमध्ये तसेच लसीकरणात माघारलेल्या गावांमध्ये अधिकाऱ्यांमार्फत प्रत्यक्ष जाऊन बैठकी घेतल्या जात आहे. म्युकरमायकोसीसवरील प्रबोधन करण्यासाठी या बैठकीतील अनेक डॉक्टर उपस्थित राहणार आहेत.
ही आहेत लक्षणे -
म्युकरमायकोसीस हा काळ्या बुरशीसारखा असतो. हा आजार केवळ डोळ्यांमध्ये नाही, तर मेंदू, हिरड्यांमध्ये तसेच छातीतदेखील होऊ शकतो. डोळ्याच्यावरच्या पापणीला सूज येणे, पापणी खाली येणे, डोळा पुढे आल्यासारखा वाटणे, डोळ्यांभोवतीची त्वचा काळसर होणे, डोळ्यांची हालचाल मंदावणे, दोन वस्तू दिसणे, नाकावर सूज येणे, चेहऱ्यावर एका बाजूने सूज, डोळ्यांमध्ये वेदना, चावताना दात दुःखणे, ही या आजाराची लक्षणे आहेत.