नागपूरMedical And Mayo Death Case : नागपूरच्या मेयो व मेडिकल रुग्णालयात मृत्यूचे आकडे अचानकपणे वाढल्यानंतर आता यावर जोरदार राजकारण देखील सुरू झालेलं आहे. काँग्रेस नेते नितीन राऊत (Congress Leader Nitin Raut) यांनी आज मेयो आणि मेडिकल रुग्णालयाचा (Medical Mayo Hospital) धावता दौरा करत परिस्थितीचा आढावा घेतला. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये (Raj Gajbhiye) यांना घेराव घातला. यावेळी मनसे नेत्यांनी डॉ. राज गजभिये यांना अक्षरशः धारेवर धरत मेडिकल रुग्णालयात सुरू असलेल्या भोंगळ कारभाराचा पाढा वाचून दाखवला आहे.
तीन दिवसांत तब्बल ६३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद : नागपूरच्या मेयो व मेडिकल या दोन शासकीय २४ तासात २५ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आकडे समोर आल्यानंतर आता तीन दिवसांत तब्बल ६३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याची माहिती पुढे आली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या १, २ आणि ३ तारखेला मेयो व मेडिकल रुग्णालयात गेल्या तीन दिवसांत ६३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये मेडिकलमध्ये ४३ तर मेयो रुग्णालयात २० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. प्रसारमाध्यमांमध्ये दिल्या जात असलेल्या बातम्या चुकीच्या असून सरासरी पेक्षा मृत्यूचे आकडे वाढले नसल्याचा दावा मेडिकल रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी केला आहे.
नागपुरात नांदेडसारखी परिस्थिती नाही : मेयो आणि मेडिकल रुग्णालयातील औषधांचा तुटवडा असल्याने तीन दिवसांत ६३ रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या मन विचलित करत असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी मेयो, मेडिकल रुग्णालयाची पाहणी केली. नितीन राऊत यांनी यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांशी चर्चा केली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी काही रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालयातून औषध हे मिळतं नसल्याचं कारण सांगितलं. त्यानंतर ते प्रसार माध्यमांसोबत बोलताना म्हणाले की, नागपुरात नांदेडसारखी स्थिती नाही. पण औषधांच्या तुटवड्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावं, स्थानिक स्थरावरचं औषध खरेदीचे अधिकार दिले जावेत. रुग्णसंख्या वाढल्याने त्यानुसार पदभरती आणि रुग्णालयातील स्वच्छतेबाबत सरकारने लक्ष द्यावं अशी मागणी, नितीन राऊत यांनी केलीय.