नागपूर -महानगरपालिकेचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी जुना सुभेदार ले-आऊट, शारदा चौक येथील इम्युनिटी बुस्टर हेल्थ ड्रिंक विकणाऱ्या क्लबमध्ये छापा टाकला. यावेळी क्लबमध्ये कोरोनाच्या दिशानिर्देशांचे पूर्णत: उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले.
हेही वाचा -संपत्तीच्या वादातून मुलानेच केला वडिलांचा खून
एका छोट्याशा खोलीत नागरिकांना कोरोना प्रतिबंधक इम्युनिटी बुस्टर सांगून काढा व ड्रिंक दिले जात असल्याची माहिती रात्री महापौरांना प्राप्त झाली होती. क्लबचे संचालक सुमित मलिक यांनी काढा घेतल्यानंतर मास्कही लावण्याची गरज नसल्याचा दावा केला होता. सूचनेची गंभीर दखल घेऊन महापौरांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता, छोट्याशा ४५० वर्ग फुटाच्या खोलीत १५० पेक्षा जास्त लोक जमा असल्याचे दिसून आले. यापैकी कुणीही मास्क घातलेला नव्हता, तसेच सामाजिक अंतराचे पालनही करण्यात येत नव्हते.
संस्थेच्या विरुद्ध सक्त कारवाई करण्याचे निर्देश
शासनाच्या दिशानिर्देशांची पायमल्ली उडविताना बघितल्यानंतर महापौरांनी उपद्रव शोध पथकाच्या जवानांना दंड लावण्याची सूचना केली. नागरिकांचे आरोग्य धोक्यात टाकल्यामुळे महापौरांनी क्लब संचालकाला चांगलेच फटकारले. अशा प्रकारे नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या संस्थेविरुद्ध सक्त कारवाई करण्याचे निर्देश महापौरांनी दिले.