नागपूर- शहरात कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. कोरोनाचे संक्रमण होऊ नये यासाठी शनिवार आणि रविवार असे किमान दोन दिवस आपल्या कुटुंबासाठी, कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी ‘जनता कर्फ्यू’चे पालन स्वयंस्फूर्तीने करा, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे. यासंदर्भात ते म्हणाले की जनता कर्फ्यू म्हणजे जनतेने स्वयंस्फूर्तीने ठेवलेला बंद आहे. या शहराचे आरोग्य ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे.
कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. दोन दिवस का होईना, आपल्या वागण्याने जर या संक्रमणावर ब्रेक लागत असेल तर आपण ते या शहरासाठी करायलाच हवे. शहरातील सर्व लोकप्रतिनिधींच्या आग्रहाखातर नागपूर महानगरपालिकेने ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केले आहे. जनता कर्फ्यू म्हणजे स्वयंशिस्त पाळणे होय. त्यामुळे हे बंद राहील का, ते बंद राहील का, पोलिसांचे दंडे पडतील का, मनपाकडून दंड ठोठावला जाईल का हे प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा आपण स्वत:हून दोन दिवस घराबाहेर पडणार नाही, असा प्रण करणे आवश्यक आहे. आपल्याला आपल्या कुटुंबाची चिंता असेल, काळजी असेल तर जनता कर्फ्यू पाळणे आवश्यक असल्याचे जोशी यांनी सांगितले.