नागपूर -केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी यांच्या स्वयंपूर्ण बहुद्देशीय संस्थेमार्फत कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मास्क तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. सध्या कोरोना विषाणूमुळे देशभरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. कोरोनाच्या संसर्गापासून बचावाकरता मास्क वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे अधिकाधिक गरजू व्यक्तींपर्यंत मास्क पोहचावे, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
या उपक्रमातून १ लाख वीस हजार मास्क तयार करण्याचे उद्दीष्ट आहे. आत्तापर्यंत नागपूर पोलिसांना ४ हजार मास्क देण्यात आले असल्याचे कांचन यांनी सांगितले.
कांचन गडकरी यांच्या संस्थेअंतर्गत मास्क तयार करण्याचा उपक्रम कोरोनाचा लागण होऊ नये, यासाठी नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. मात्र, लोकांना कोरोनाविषयी तसेच, उद्भवलेल्या परिस्थितीचे गांभीर्य नाही, कोरोनाचा प्रादुर्भाव ज्या वेगाने वाढत आहे त्या तुलनेत मास्क आणि सॅनिटायझरचा पुरवठा कमी आहे. यामुळे अनेक सामाजिक संघटनांनी मास्क तयार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
शहरातील विविध ठिकाणी तयार झालेले मास्क एकत्र करून गडकरी यांच्या घरी पोहोचवले जातात. त्यानंतर ज्या ठिकाणी मास्कची गरज आहे, अशा ठिकाणी हे मास्क पोहोचवले जातात. स्वयंपूर्ण महिला बहुद्देशीय संस्थेसारख्या अनेक सेवाभावी संस्था मास्क तयार करण्यासाठी पुढे आल्याने लॉकडाऊनमध्ये बेरोजगार महिलांनाही काम मिळाले आहे.