नागपूर:शहीद गोवारी स्मृती दिवस आहे. 1994 साली आपल्या न्याय मागण्यांसाठी नागपूरच्या विधीमंडळावर काढलेल्या मोर्चात राज्यातील हजारो गोवारी बांधव सहभागी झाले होते. मोर्चेकरी आणि पोलिसांमध्ये उडालेल्या संघर्षात गोवारी समाजातील 114 गोवारी बांधवांचे हुतात्मे झाले होते. त्या दुर्दैवी घटनेचा २८ वा स्मृती दिवस आहे. त्यादिवशी गोवारी समाजातील शेकडो कुटुंबानी आपल्या स्नेही लोकांना गमावले होते. त्यादिवसाची आठवण म्हणून हजारो गोवारी बांधव नागपूर येथील शहीद गोवारी स्मारक येथे एकत्रित झाले आहेत.
जीवाचे बलिदान देणाऱ्या ११४ शहिदांना श्रद्धांजली:आपल्या न्याय मागण्यांसाठी गोवारी समाजाने मोर्चा काढला होता. मात्र २८ वर्षानंतर देखील गोवारी समाजाच्या मागण्या जशाच्या- तशा असल्याने गोवारी समाजात व्यवस्थेविरुद्ध चीड आणि राज्यकर्त्यांबद्दल असंतोष असल्याचे दिसून येतो. गोवारी समाजासाठी जीवाचे बलिदान देणाऱ्या ११४ शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि मानवंदना देण्यासाठी दरवर्षी हजारो गोवारी बांधव नागपूरच्या शहीद गोवारी स्मारक येथे आले आहेत.
28 वर्षांपूर्वी काय घडले होते:1994 चा तो दिवस होता. राज्याचे मुख्यमंत्री शरद पवार होते. त्यादिवशी राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना हजारो गोवारी समाजातील बांधव आपल्या मागण्यांसाठी विधीमंडळावर मोर्चा घेऊन आले होते. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार आणि आदिवासी विभागाचे मंत्री मधुकर पिचड यांनी मोर्चेकऱ्यांची भेट घेण्यासाठी यावे. या मागणीवर मोर्चेकरी अडून बसल्याने तणाव वाढत होता. त्याचवेळी पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. त्यामुळे मोर्चेकरी सैरभैर होऊन पळत असताना एका पोलीस अधिकाऱ्यांच्या बंदुकीतून गोळी सुटली. ज्यामुळे गोंधळ आणखीच वाढला. चेंगराचेंगरी होऊन ११४ गोवारी बांधवांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. आज त्या घटनेला २७ वर्ष पूर्ण झाले असले, तरी दुःख मात्र किंचितही कमी झालेले नाही.
राजकारण्यांनी आमचा वापर केला: गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधाऱ्यांनी गोवारी समाजाचा उपयोग केवळ आणि केवळ राजकारणाकरिता केला असल्याचा आरोप गोवारी समाजातील मंडळींनी केला आहे. केवळ आपले राजकीय स्वार्थ पूर्ण करण्यासाठी सर्वच राजकारण्यांनी आश्वासनांच्या खैराती वाटल्या असल्याचे ते म्हणाले आहेत.
उपमुख्यमंत्री गोवारी स्मारकावर नतमस्तक:राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आज शहीद गोवारी स्मारक येथे उपस्थित झाले होते. त्यांनी स्मारकाला अभिवादन केल्यानंतर समाजबांधवांच्या व्यथा जाणून घेतले आहे.