नागपूर - प्रसिद्ध बडग्या-मारबत उत्सवावर या वर्षी बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे नागपुरकरांच्या उत्सवावर विरजण पडले आहे. मारबत उत्सव गेल्या १३५ वर्षांपासूनच अविरत साजरा होतो आहे. मात्र या वर्षी कोरोना विषाणूंचा वाढता संसर्ग लक्षात घेता मारबतीचा कार्यक्रम व मिरवणूक काढण्यावर महानगर पालिकेच्या आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रतिबंध घातला आहे. बडग्या मारबत मिरवणूक म्हणजे नागपूरला लाभलेला हा ऐतिहासिक वारसा आहे. बैल पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच तान्ह्या पोळ्याला मारबत बडग्याच्या मिरवणूक शहरातून काढली जाते. देशात एकमात्र नागपुरात हा उत्सव साजरा केला जातो. मात्र मारबत म्हणजे नेमकं काय हे जाणून घेण्याची उत्सुकता नागरिकांमध्ये आहे. जाणून घ्या काय आहे बडग्या मारबत उत्सव...
धावपळीच्या या युगात आपल्याला आपल्याच संस्कृतीचा विसर पडत असताना राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुराने १३५ जुना प्राचीन आणि ऐतिहासिक वारशाचे जतन केले आहे. नागपूर शहराला सावजी मटण, हिवाळी अधिवेशन, वऱ्हाडी पाहुणचार आणि गोड गोड संत्र्यांसाठी ओळखल जातं. पण नागपुरची आणखी एक ओळख आहे ती म्हणजे बडग्या-मारबत प्रथा.
समाजातील अनिष्ट प्रथांचे उच्चाटन करण्याच्या हेतूने तान्हा पोळ्याच्या दिवशी मारबतीची मिरवणूक काढली जाते. यामध्ये ऐतिहासिक काळी व पिवळी मारबतीसह बडगे तयार केले जातात. मारबत म्हणजे वाईट रूढी परंपरा आणि अंधश्रद्धेचं दहन आणि चांगल्या परंपरा आणि विचारांचं स्वागत करणे होय. महाभारत काळाचा संदर्भ देखील या उत्सवाला दिला जातो. कृष्णाच्या वध करण्यासाठी आलेल्या पुतना मावशी प्रतीक काळी मारबत आणि लोकांचं रक्षण करणारी पिवळी मारबत अशा दोन विशाल मूर्ती असतात.
इंग्रजांच्या काळात देशात नागरिकांना एकत्र येण्यासाठी टिळकांनी ज्या पद्धतीने पुण्यात गणेशोत्सव सुरु केला. त्याच धर्तीवर नागपूर येथे मारबत उत्सव सुरु करण्यात आला. गणेशोत्सवा पेक्षा देखील जुना उत्सव म्हणून मारबत प्रसिद्ध आहे. प्राचीन काळात अनेक रूढी परंपरा होत्या. ज्या मानव जातीसाठी घातक ठरत होत्या. त्यांचं प्रतीक म्हणजे काळी मारबत, तर ज्या चांगल्या परंपरा आहे. त्याच प्रतीक म्हणजे पिवळी मारबत. वाईट परंपरा, रोग राई,संकट समाजातून घालवाव्या आणि चांगल्याच स्वागत करावं, यासाठी ही मारबत निघत असते.