नागपूर Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी 20 जानेवारीला मुंबईच्या दिशेनं कूच करण्याचा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय. त्यामुळं शासन आणि प्रशासन अॅक्टिव्ह मोडवर आलंय. मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु झाले आहेत. त्याअंतर्गत मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगानं दिलेल्या प्रश्नावलीच्या अनुषंगानं नागपूर जिल्ह्यात सर्वेक्षणाचं काम करण्यात येणार आहे. 100 कुटुंबामागं एका प्रगणकाची नेमणूक करत प्रशिक्षणानंतर सर्वेक्षणाचं काम चार दिवसात पूर्ण करण्याचं नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेत. राज्य मागासवर्ग आयोगानं तयार केलेल्या प्रश्नावलीच्या अनुषंगानं जिल्ह्यात सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या अनुषंगानं नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी हे निर्देश दिलेत.
शंभर कुटुंबामागं एक प्रगणक नेमा : या संपूर्ण सर्वेक्षण मोहिमेचं तालुकास्तरावर तहसीलदार इन्सिडंट कमांडर असून त्यांना प्रगणक नेमणूक करण्याचे अधिकार असणार आहेत. तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल, शिक्षक, आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासह आवश्यक प्रगणकांच्या नियुक्त्या करण्याचे अधिकार त्यांना असणार आहेत. यासोबतच गरजेनुसार राखीव कर्मचारी वर्गही नियुक्त करण्यात यावा, सर्वेक्षणाची चुकीची माहिती समाजमाध्यमांवरुन प्रसारित करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचंही जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी यावेळी सांगितलंय.