नेत्र तज्ञ डॉ. अनिल बजाज यांची प्रतिक्रिया नागपूर :नागपूरसह पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यामध्ये डोळ्यांची साथ आली आहे. विशेषतः लहान शाळकरी मुलांचे डोळे येण्याचे प्रमाण अधिक आहे. मात्र, सर्वच वयोगटातील नागरिकांमध्ये ही लक्षणे दिसून येत आहेत. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साथीचे आजार हे वाढत असतात. या काळात उद्भवणाऱ्या प्रमुख आजारांपैकी एक आजार म्हणजे डोळे येणे हा देखील आहे.
डोळे येणे संसर्गजन्य रोग :डोळे येणे (कंजक्टिवाईटीस) हा संसर्गजन्य रोग आहे. हा मुख्यत्वे ॲडिनो नामक व्हायरसमुळे होतो. शिवाय या रोगाला पिंकआय असे देखील म्हणतात. महत्वाचे म्हणजे कधी कधी दोन्ही डोळ्यांवरही त्याचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे योग्य औषधोपचार केल्यास दोन ते तीन दिवसात डोळे बरे होऊ शकतात, अशी माहिती नेत्र तज्ञ डॉ. अनिल बजाज यांनी दिली आहे.
डोळ्यांची दृष्टी जाण्याची शक्याता : यावर्षी डोळ्यांचा संसर्ग सौम्य स्वरुपाचा दिसत असला, तरी संसर्ग मोठ्याप्रमाणात होतो आहे. साधारणपणे हा संसर्ग एका डोळ्याला होतो. यावेळी मात्र, संसर्गाचे लक्षणे दोन्ही डोळ्यांमध्ये दिसत आहेत. कुणाला डोळ्यांचा त्रास जाणवत असल्यास तात्काळ नजीकच्या आरोग्य संस्थेत जाऊन औषधोपचार करुन घेणे गरजेचे आहे. अन्यथा डोळ्यांची दृष्टी कमी होणे, कायम दृष्टी जाणे यासारखी गुंतागुत निर्माण होण्याची शक्यता असते.
विद्यार्थ्यांची संख्या अधिक :गेल्या काही दिवसांपासून पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये डोळे येण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यातही शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये ही संख्या अधिक आहे. नागपूर, भंडारा, वर्धा जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांना या आजराची सर्वाधिक लागण झालेली आहे.
डोळे येण्याची लक्षणे ओळखा : डोळे येण्याची साथ डोकेवर काढत असली, तरी याची लक्षणे ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. डोळयांना सतत खाज येणे, चिकटपणा येणे, डोळयांना सूज येणे, डोळे लालसर होणे, डोळ्यातून पिवळा द्रव बाहेर येणे अशी लक्षणे या आजाराची असतात.
डोळे आल्यास काय काळजी घ्याल :कुणाला डोळ्याला त्रास होत असेल, तर रुग्णाने डोळयांना स्वच्छ पाण्याने सतत धुवत राहावे, दिवसांतून किमान दर तासाला डोळे धुतल्यास फायदेशीर राहील. इतर कुण्या व्यक्तींचा रुमाल किव्हा टॉवेल, कपडे इत्यादीने आपले डोळे पुसू नये. डोळयांना वारंवार स्पर्श करु नये, उन्हात काळ्या रंगाच्या चष्म्यांचा वापर करावा. आपल्या सभोवतालचा परिसर हा स्वच्छ ठेवावा, कचऱ्यामुळे त्यावर माशा बसतात. नंतर त्याच माशा डोळयाची साथ पसरवतात, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधी डोळयात टाकावी.
प्रतिबंधात्मक उपाययोजना :स्वच्छता राखने, नियमित हात धुणे, नेहमी सारखा डोळयांना हात लाऊ नये. ज्या व्यक्तींना हा आजार झाला असेल त्या व्यक्तींनी इतरांच्या संपर्कात जाऊ नये. शाळा, वस्तीगृहे, अनाथालय अशा संस्थात्मक ठिकाणी अशी साथ आली असेल, मुलांना, व्यक्तींला वेगळे ठेवण्याची गरज आहे. पावसाळयामुळे चिकचिक, घरगुती माशा किंवा चिलटांचा प्रादूर्भाव असल्यास परिसर स्वच्छता ठेवावा असे डाॅ. अनिल बजाज यांनी सांगितले.