नागपूर- योग अभ्यास हा भारताने जगाला दिलेला अमूल्य ठेवा आहे. निरोगी आणि सुदृढ आयुष्य जगायचे असल्यास नियमित योगा हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. त्यामुळेच भारतीय योग साधना आता देशविदेशात प्रचलित झाली आहे. योगा करण्याचे विविध प्रकार प्रसिद्ध होत असताना आता त्यात 'सायकल योगा'ची भर पडली आहे. योग दिनानिमित्ताने 'ईटीव्ही भारत'चा खास वृत्तांत...
नागपुरात राहणाऱ्या मंगला पाटील या महिला गेल्या अनेक वर्षांपासून सायकल चालवताना योगा करतात. भल्या पहाटे सायकलवर त्यांचा हा 'सायकल योगा' सुरू होतो. सुदृढ आरोग्यासाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी त्यांनी सायकल योगा हा नाविन्यपूर्ण योगा प्रकार विकसित केला आहे. मंगला पाटील या सायकल चालवतानाच चक्क हॅण्डलचे दोन्ही हात सोडून अनुलोम - विलोम करतात. एवढेच काय त्या विविध प्रकारचे योगाचे वेगवेगळे आसने सायकलवरच करतात. कधी जोरजोरात हात हालवणे, तर कधी पायाच्या करामती त्या करत असतात. हा योगाअभ्यास सुरू असताना त्यांची सायकल चालवण्याची प्रक्रियासुद्धा निरंतर सुरूच असते.