नागपूर - वन विभागाच्या चमूला मिळालेल्या माहितीच्या आधारे वाघाच्या अवयवांची तस्करी करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. जागतिक व्याघ्र दिनाच्या संध्येला मध्यप्रदेशच्या बीछवासाहानीमध्ये गुरवारी (काल) रात्री धाड टाकत मोठी कारवाई केली आहे. यामध्ये वाघाची पूर्ण कातडी आणि चार पंजे जप्त केले आहे. मोतीलाल केजा सलामे वय (55) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
नागपूर वनविभागाच्या चमूला मध्यप्रदेशात एका व्यक्तीकडे वाघाचे अवयव असून त्या अवयवांची तस्करी करत असल्याची माहिती मिळाली. या अवयवांची नागपूर जिल्ह्यात विक्री होणार असल्याची माहिती मिळाली. यावर वनविभाग माघावर असताना व्याघ्र दिनाच्या संध्येला ही कारवाई करण्यात आली. यात 55 वर्षीय मोतीलाला केजा सलामे हा शेतात राहत असून त्याच ठिकाणी असलेल्या घरात त्याच्याकडून मृत वाघाची संपूर्ण कातडी आणि ४ पायाचे पंजे जप्त केले. यासोबत आरोपीकडून 1 मोबाइलही जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात मोतीलाल केजा सलामे याच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियमा अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या अधिक चौकशीकरीता नागपूर वनविभागाव्दारे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी, सावनेर यांचे न्यायालयातून आरोपीला हजर करून 3 ऑगस्टपर्यंत वन कोठडी मिळाल्याची माहिती उपवनसंरक्षक डॉ.भारत सिंह हाडा यांनी दिली आहे.