नागपूर - इच्छा असेल तर कुठलेही काम अशक्य नाही, असे कायम म्हटले जाते. सर्वत्र कोरोनाचे संकट गडद होत असताना बाजारात नफाखोरी करणारे धंदे जोमात आहेत. बाजारात सात ते दहा हजार रुपये किंमतीला मिळणारी ऑटोमॅटीक सॅनिटाईझर मशीन नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील एका प्राध्यापकाने केवळ दीडशे ते दोनशे रुपये खर्च करून तयार केली आहे. निखिल मानकर असे संशोधक प्राध्यापकाचे नाव आहे. ते सध्या आदर्श विद्यालय आणि स्वर्गीय आनंदराव पाटील केदार कनिष्ठ महाविद्यालयात व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्राध्यापक आहेत. त्यांनी केवळ मशीन तयारच केली नाही तर मशीन तयार करण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांना देखील शिकवले आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील लोक, शाळा, महाविद्यालये महागडे मशीन घेऊ शकत नाही, त्याठिकाणी मानकर सरांचे विद्यार्थी हे मशिन बसवून देणार आहेत.
ऑटोमॅटीक सॅनिटाईझर मशीनची माहिती देताना प्रा. मानकर सर टाकाऊ ते टिकाऊ या नियमाचे पालन करत प्राध्यापक निखिल मानकर नेहमीच विद्यार्थ्यांना काही तरी नवीन करण्याची प्रेरणा देत असतात. व्यावसायिक अभासक्रमाचे शिक्षण देताना तोच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी कोरोनाच्या संकटात सर्वाना परवडेल आणि समाजाच्या उपयोगात येईल, या हेतूने ऑटोमॅटीक सॅनिटाईझर मशीन तयार करायला सुरुवात केली. तेव्हा सर्वात पहिला प्रश्न त्यांना पडला तो म्हणजे कमीत कमी खर्चात मशीन करिता कॅबिनेट कसे तयार केले जाऊ शकेल. तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर आला तो म्हणजे खाद्य तेलाचा पिपा (टिन). एका बाजूने टिन कापून घेतल्यानंतर त्यांनी मागच्या बाजुला घरी उपयोगात नसलेली भरणी आणि पाईप जोडून सॅनिटाईझर टॅंक तयार केली. त्यानंतर बॉल पेनच्या कॅप म्हणजेच टोकनचा उपयोग करून नोझल तयार केले. केवळ १० रुपये किमतीत मिळणारे सेन्सर देखील त्यात बसवून ऑटोमॅटीक सॅनिटाईझर मशीनची निर्मिती केली आहे.
हेही वाचा -'ऑनलाईन' शिक्षणासाठी स्मार्ट फोन आणायचा कुठून?, शाळा सोडून विद्यार्थ्यांना जुंपलं शेतात
हे यंत्र तयार करत असताना त्यांना केवळ १५० ते २०० रुपयांचा खर्च मानकर सरांना आला आहे. या यंत्राच्या तुलनेत बाजारात मिळणारे ऑटोमॅटीक सॅनिटाईझर मशीन सात ते दहा हजार रुपयाला विकत घ्यावे लागते. मानकर सरांनी मशीन तयार करण्याचे तंत्रज्ञान आपल्या विद्यार्थ्यांना दिले असून ग्रामीण भागातील शाळांमध्ये अश्या प्रकारचे मशीन बसवण्याचा त्यांचा मानस आहे.
हेही वाचा -'राज्यात लवकरच कौशल्य विकास विद्यापीठाची स्थापना होईल'