नागपूर -भाजपने रामाला आदर्श मानले असते तर सत्तेतून जाण्याची वेळ आली नसती. देवेंद्र फडणवीसांनी ज्याप्रकारे भल्या पहाटे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्यामुळे मराठी माणसाची मान खाली गेली, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
महाविकासआघाडीचे सरकार सक्षम
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे राज्यात अनैतिक सरकार येण्याचे राहिले. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे कायद्यात रूपांतर झाले पाहिजे. यासाठी आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला पाहिजे. जेणे करून पुन्हा अशी परिस्थिती उद्भवनार नाही, अशी मागणीही चव्हाण यांनी केली.
देशाची अर्थव्यवस्था संकटात आहे. राज्यातही आर्थिक श्वेतपत्रिका काढण्याची गरज आहे. राज्यातील पायाभूत प्रकल्प मागील पाच वर्षांत पूर्णत्त्वास गेला नाही. भाजपच्या काळात झालेल्या घोटाळे चौकशी करून समोर आणले पाहिजेत. डळमळीत झालेली अर्थव्यवस्था महाविकासआघाडी सरकारच्या हातात आली आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी आघाडीतील सर्व पक्ष सक्षम आहेत. मात्र, त्या अगोदर जनतेच्या समोर अर्थव्यवस्थेची सत्य परिस्थिती समोर आली पाहिजे, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यपालांकडे केली.
एमपी मिल कंपाऊंड प्रकरणी प्रकाश मेहता यांची चौकशी झाली. त्यांना निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाली नाही. मात्र, फक्त टिकीट कापून शिक्षा होऊ शकत नाही, असेही चव्हाण म्हणाले.