नागपूर :थेट परकीय गुंतवणूक (FDI) आकर्षित करण्यात कर्नाटक आणि गुजरातला मागे टाकत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य बनले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली.
महाराष्ट्रात 29 टक्के परकीय गुंतवणूक : 'मला हे जाहीर करताना अत्यंत आनंद होत आहे की, महाराष्ट्र सर्वाधिक एफडीआय आकर्षित करणारे राज्य बनले आहे,' असे ते सोमवारी म्हणाले. फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार, 'डीआयपीपी अहवाल सार्वजनिक करण्यात आला असून, महाराष्ट्रात सर्वाधिक 29 टक्के एफडीआय आले आहे. त्या तुलनेत कर्नाटकात 24 टक्के आणि गुजरातमध्ये 17 टक्के एफडीआय आले आहे.'
'आघाडीच्या काळात राज्याची प्रतिमा मलिन झाली' :नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले की, 'देशांतर्गत आणि थेट विदेशी गुंतवणुकीच्या बाबतीत आम्ही महाराष्ट्राच्या नेतृत्व क्षमतेबद्दल नेहमीच आशावादी होतो. दुर्दैवाने, महाविकास आघाडी सरकारच्या 2.5 वर्षांच्या काळात, गुंतवणूकदारांमध्ये विश्वास नसल्यामुळे राज्य मागे पडले होते. त्यावेळी नेतृत्वाचा अभाव होता. महाविकास आघाडीत भ्रष्टाचार आणि ब्लॅकमेलिंगमुळे देश आणि परदेशातील गुंतवणूकदारांमध्ये राज्याची प्रतिमा मलिन झाली होती'