नागपूर -अहमदनगर येथील पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्याने आत्महत्या केली ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. आम्ही त्यांच्या कुटुंबीयांना भेट देणार आहोत. तसेच त्यांना पाहिजे ती मदत देणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. ते आज नागपुरात माध्यमांशी बोलत होते.
अहमदनगरमधील आत्महत्येची घटना दुर्दैवी, सरकार पाहिजे ती मदत करणार - गृहमंत्री अनिल देशमुख नवीन सरकार आल्यापासून कर्जमाफीचे धोरण सुरू केले आहे. त्याची पहिल्या टप्प्यातील सुरुवात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केली. टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांचे कर्जमाफ होणार आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन महिन्यामध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, असे गृहमंत्री म्हणाले.
'अरे बळीराजा करू नको आत्महत्या'-
मल्हारी बटुळे या शेतकऱ्याने नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून गुरुवारी आत्महत्या केली. आत्महत्येच्या दोन तास आधी त्यांचा तिसरीत शिकणारा मुलगा प्रशांत याने शाळेत 'अरे बळीराजा आत्महत्या करू नको' ही कविता सादर केली होती. पाथर्डी तालुक्यातील भारजवाडीमध्ये राहणाऱ्या बटुळे यांनी ट्रॅक्टर आणि शेतीसाठी बँकेकडून कर्ज घेतले होते. मात्र, काही महिन्यांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे पीक उद्ध्वस्त झाले. हे कर्ज फेडण्याच्या विवंचनेतून त्यांनी आपले जीवन संपवले. या घटनेने त्यांचा मुलगा प्रशांत पुरता हादरून गेला आहे. बाबा या जगात आता नाहीत, या वास्तवाने तो हवालदील झाला आहे.