नागपूर :नागपूर शहरातील लकडगंज येथील आधुनिक सर्व सोयीसुविधायुक्त पोलीस स्टेशन, पोलीस उपायुक्त कार्यालय तसेच ३४८ पोलीस निवासी सदनिका असलेल्या निवासी संकुलाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थिती होते. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणाद्वारे काही मुद्दे उपस्थित करून त्यांनी नागपूरमध्ये पोलिस कार्यालयचे आणि प्रकल्पाची माहिती दिली. त्यांनी म्हटले की, पोलीस 12 ते 24 तास ड्युटी करतात त्यांची राहण्याची चांगली व्यवस्था पाहिजे. पोलीस क्वार्टरमध्ये चांगल्या सुविधा पाहिजे, 2014 नंतर पोलीस हाऊसिंगची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेतली. पोलीस हाऊसिंग चांगले काम करत आहे. पण वेग कमी आहे, पोलीस हाऊसिंगमध्ये काही झारीचे शुक्राचार्य आहेत जे अतिशय वेळ लावतात. त्यामुळे प्रकल्पाचे महत्व कमी होते. कामाचा स्पीड वाढवला पाहिजे टेंडर काढण्यासाठी वर्ष लागू नये. आपल्याला एक लाख सेवानिवास तयार करायचे आहे. नागपूर पोलीस आयुक्तालय कार्यालयाची इमारत अतिशय चांगली आहे. अनेक राज्यांच्या महासंचालक कार्यालयापेक्षा पोलीस आयुक्त कार्यालय चांगली आहे.यानंतर त्यांनी म्हटले की, पोलीसांसाठी निवास संकुल बांधण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला असून राज्यात 1 लाख सेवानिवास बांधण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. नवीन पोलीस स्टेशनच्या बांधकामासोबत निवास संकुल बांधण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. पोलीस गृहनिर्माण विभागाने बांधकामामध्ये होत असलेला विलंब टाळुन सर्व सुविधायुक्त सेवानिवास प्रकल्पाला गती द्यावी अशी सूचना यावेळी त्यांनी केली.
हक्काचा निवारा मिळावा यासाठी कर्ज सुविधा उपलब्ध:नागपूर शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नवीन पोलीस स्टेशनसाठी प्रस्ताव तयार करावा. त्यानुसार यासाठी मंजुरी देता येईल. पोलीसांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी कर्ज सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. ही सुविधा सुरु राहावी यासाठी बँक ऑफ इंडिया सोबत करार करण्यात येत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. पोलिसांच्या आरोग्य तपासणीसाठी डिजिटल हेल्थ फाईल तयार करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.