नागपूर -नागरिकत्व कायदा न्यायालयात टिकल्यानंतर राज्यात लागू करण्याविषयी विचार आम्ही करू, देशात लोकांना तणावात ठेवून केंद्र सरकार आपला कारभार हाकत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात आल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
शेतकऱ्याला कर्जमुक्त नव्हे तर चिंतामुक्त करायचे आहे, त्यासाठी जो काही योग्य निर्णय घ्यावा लागेल तो घेऊ. विकासकामांना स्थगिती दिली जात आहे म्हणून आमच्यावर टीका केली जात आहे. मात्र, विनाकारण कोणत्या कामांना स्थगिती देत नाही, आम्ही विकासकामांना स्थगिती देत नसून आढावा घेतला जात आहे. मुंबईत मेट्रो कारशेडला मात्र आमचा विरोध आहे, तेथील जैवविविधतेला नुकसान पोहचत होते, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
हेही वाचा -'अनुभव नसला तरी आत्मविश्वास भरपूर, जनतेचे प्रश्न मार्गी लावू'
सावरकरांवरील राहुल गांधींच्या वक्तव्यावरून शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मात्र, तसे होणार नाही, आम्ही भिन्न विचारांची माणसं एकत्र आलो आहोत, किमान समान कार्यक्रमाखाली खाली आम्ही काम करणार आहोत. लोकांना तणावात ठेवून केंद्र सरकार आपला कारभार हाकत आहे. मूलभूत समस्या सोडून जनतेचे लक्ष भरकटवण्याचे काम सुरू आहे. देशात भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे, सावरकरांच्या मतानुसार त्यांना एक देश हवा होता, तसा देश तुम्ही एकत्र करत आहात का? असा सवाल त्यांनी भाजपला केला.
राज्याच्या तिजोरीची चावी आत्ताशी आमच्याकडे आली आहे, ती अजून उघडायची आहे, त्यामुळे आर्थिक स्थितीविषयी काय असेल ती खरी आकडेवारी लवकरच जाहीर केली जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.