महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नैना प्रकल्प हा आधुनिक भांडवलदारांचा, दलाल आणि अधिकाऱ्यांची खळगी भरणारा-अंबादास दानवे - अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम

Maharashtra Assembly Winter Session 2023 : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज सहावा दिवस आहे. पाचव्या दिवशी अनेक मुद्द्यांवरुन गदारोळ झाला. यात प्रामुख्यानं आरोग्य खात्याच्या हलगर्जीपणावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलंय. तसंच लहान मुलांच्या आत्महत्येवरुनही विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय.

Maharashtra Assembly Winter Session 2023
Maharashtra Assembly Winter Session 2023

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 14, 2023, 9:45 AM IST

Updated : Dec 14, 2023, 11:53 AM IST

नागपूर Maharashtra Assembly Winter Session 2023 :विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज सहावा दिवस आहे. मराठा आरक्षण, जुनी पेन्शन आदी विषयांवरून विधिमंडळात विरोधक गरारोळ करण्याची शक्यता आहे.

Live updates

  • पनवेल तालुक्यातील गावांमध्ये राबविण्यात येत असलेला नैना प्रकल्प हा आधुनिक भांडवलदारांचा आहे. हा प्रकल्प काही अधिकाऱ्यांना पोसणारा, काही दलाल व बिल्डर्सच्या फायद्यासाठी व त्यांची खळगी भरण्यासाठी असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते दानवे यांनी केला. तसेच शेतकऱ्यांचा हिताचा विचार करून सरकारने हा प्रकल्प तातडीने रद्द करावा, अशी मागणी दानवे यांनी सभागृहात केली. अल्पकालीन चर्चेद्वारे उपस्थित झालेल्या मुद्द्याद्वारे नैना प्रकल्पाबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात आग्रही भूमिका मांडली.
  • महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, राज्य सरकार ओबीसींसाठी कोणतेही धोरण आखत नाहीत. महाराष्ट्रातील सरकारला ओबीसी आणि मराठा यांच्यात तेढ निर्माण करायची आहे. त्यांना इतके भांडू द्यायचे की त्यांना आरक्षणाचा विसर पडेल. आरक्षणासाठी भाजपानं हा प्लॅन केला असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केला.
  • उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राजकीय नेत्यांवर पीएचडी सुरू आहे. पीएचडीबाबतच्या माझ्या विधानाचा विपर्यास व्यक्त करण्यात आला. मी दिलगिरी व्यक्त करतो. कांदा, इथेनॉल आणि दूध दराप्रश्नी चर्चा करण्यासाठी अमित शाह यांची वेळ मागितली आहे. उद्या रात्री १० वाजता त्यांची भेट घेणार आहोत. जुन्या पेन्शन योजनेबाबत कर्मचाऱ्यांनी टोकाची भूमिका घेऊ नये.
  • राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार गटाचे नेते रोहित पवार म्हणाले, छगन भुजबळ हे ज्या प्रकारची भाषणे करत आहेत, ते मला मान्य नाही. ते ज्या प्रकारची भाषणे करत आहेत, त्याविरोधात मी आहे. ते म्हणत असतील तर त्यांच्या विरोधात धोका आहे तर नक्कीच सरकारनं याकडे लक्ष द्यावे. त्यांच्या सभोवतालची सुरक्षा वाढवावी. महाराष्ट्रात एखाद्याला जीवे मारण्याची धमकी देणे योग्य नाही, आम्ही याच्या पूर्ण विरोधात आहोत, असेही रोहित पवार यांनी म्हटलं.

बुधवारी सभात्याग-विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी गडचिरोली आणि बुलढाणा येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूतीदरम्यान झालेल्या दोन महिलांच्या मृत्यूला आरोग्य खात्याचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केला. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी याबाबत राजीनामा द्यावा, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. आरोग्य विभागाच्या कारभाराचा निषेध करून दोषींवर कडक कारवाईची मागणी करत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला.


मुलांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारनं उपाययोजना कराव्या : नवी मुंबईत दोन विद्यार्थ्यांनी मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचं समोर आलंय. या घटना गंभीर आहेत. यावरुन मुलांना किती मानसिक तणाव आहे हे लक्षात येतं. वाढती स्पर्धा, अभ्यासक्रमाचं ओझं अशा कारणांनी या आत्महत्या वाढत आहेत. या आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. नवी मुबंईतील दोन मुलांच्या आत्महत्या झाल्याची घटना घडल्याची माहिती विधानसभेत वडेट्टीवार यांनी दिली. तसंच यावेळी त्यांनी शाळेच्या वेळा बदलण्याचीही मागणी केलीय.

शासनाला बेरोजगारांची फौज निर्माण करायची आहे का? : राज्यात गेल्या दहा वर्षांपासून दीड लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी पॅरामेडिकल कौन्सिलनं नोंदणी न केल्यामुळं बेरोजगार आहेत, तर सरकार दुसरीकडं राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना कमी करण्याच्या तयारीत आहे. राज्य शासन बेरोजगारांची राज्यात बेरोजगारांची फौज निर्माण करु पाहतंय का? या सर्वांना कधी न्याय देणार? असा सवाल काँग्रेसच्या नेत्या आमदार ॲड यशोमती ठाकूर यांनी विधानसभेत उपस्थित केला.

रक्तपेढयांमध्ये अँलिकॉट मशीन उपलब्ध करावं : रक्ताशी संबंधित विविध प्रकारचे आजार असलेल्या लहान मुलांमध्ये प्रौढ रुग्णांइतकी रक्ताची गरज लागत नाही. परिणामी शिल्लक राहिलेलं रक्त वाया जाऊ नये यासाठी रक्तपेढ्यांमध्ये अँलिकॉट मशीन म्हणजेच रक्ताच्या लहान पिशव्या तयार करणारं यंत्र उपलब्ध असणं गरजेचं आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या 31 रक्तपेढ्यांपैकी केवळ 8 रक्तपेढ्यांमध्ये तसंच वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील 14 रुग्णालयांपैकी केवळ 3 ठिकाणी अँलिकॉट मशीन ही सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळं यासर्व रक्तपेढ्यामध्ये या मशीन तातडीनं उपलब्ध करुन देण्यात याव्यात, अशी मागणी भाजपा आमदार ॲड आशिष शेलार यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून केली. यावर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील 31 शासकीय रक्तपेढ्यांमध्ये अँलिकाँट मशीन येत्या एका महिन्यात बसवण्यात येतील, अशी घोषणा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी विधानसभेत केली.

शाळेच्या आवारात किंवा परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कायदा : राज्यातील शाळांच्या 100 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थी विक्रीवर आमदार विक्रम काळे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला. राज्य सरकारच्या वतीनं अनेक एजन्सीच्या माध्यमातून अशा प्रकारच्या पदार्थांच्या विक्रीवर निर्बंध घालण्यात येत आहे, तरीदेखील अशा प्रकारचे तंबाखूजन्य पदार्थ विक्री होत आहेत. याला कारण म्हणजे या तंबाखूजन्य पदार्थ विक्रीचं मोठं रॅकेट असल्याचा दावा आमदार काळे यांनो केलाय. या पान टपऱ्यावर फक्त कारवाई करुन भागणार नाही तर शाळेच्या परिसरात पान टपरी तुम्हाला टाकता येणार नाही अशा प्रकारची कारवाई किंवा ठोस पावले उचलता येतील का अशा प्रकारचा कायदा करता येईल का? असा प्रश्न आमदार विक्रम काळे यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. यावर शाळा परिसरातील तंबाखूजन्य पदार्थाची विक्रीला आळा घालण्यासाठी भरारी पथकं तैनात करण्याबाबतची घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी विधानपरिषदेत केली.

हेही वाचा :

  1. आदित्य ठाकरे देश सोडून जाण्याची शक्यता, लूकआऊट नोटीस जारी करावी-नितेश राणे यांची मागणी
  2. राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष, सदस्यांनी राजीनामा का दिला?-विजय वडेट्टीवार
Last Updated : Dec 14, 2023, 11:53 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details