नागपूर-विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. विधानपरिषेदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तोंडाला मास्क लावून आणि गळ्यात स्टेथस्कोप घेऊन आरोग्य विभागाच्या कारभाराचा निषेध केला आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.
Live updates
- राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष, सदस्यांनी राजीनामा का दिला? त्यांच्यावर कोणता दबाव होता? असा प्रश्न विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात उपस्थित केला. यायबाबतची माहिती सभागृहाला कळली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. राज्य मागासवर्गीय आयोग हा ओबीसी रक्षणसाठी आहे. हा आयोग स्वायत्त आहे. चार तारखेला या आयोगाचे अध्यक्ष निरगुडे यांनी राजीनामा दिला. राजीनाम्याचे कारण काय? याबाबत सभागृहाला माहिती मिळाली पाहिजे, अशी वडेट्टीवार यांनी मागणी केली. या संदर्भात माहिती घेऊन सांगण्यात येईल, असे उत्तर सरकारकडून देण्यात आले.
- जानेवारी ते जून 2023 या कालावधीत मुंबईत रस्ते अपघातात 147 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाण यांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिलं. जानेवारी ते जून या कालावधीत मुंबईत १३२ अपघात झाले आहेत. त्यात १४७ जणांचा मृत्यू झाला आहे. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी जुन्या पेन्शन योजनेबाबत यू टर्न घेतला आहे. जुन्या पेन्शन योजनेबाबत आपण सकारात्मक पुनर्विचार करणार आहोत, असे अर्थमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
- कॉलेज आणि शाळांमध्ये ड्रग्ज विक्रीच काम सुरू आहे. पैशांच्या आमिषाला लोक बळी पडत आहेत. लहान मुले ड्र्ग्ज घेताना पाहिले आहे. मुलांना पकडून त्यांच्याकडून माहिती घ्यावी. ललितनं काही लोकांना घेऊन ड्र्ग्जची फॅक्टरी सुरू केली असल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी केला.
- योग्य कारवाई केली नाही तर पुढची पिढी बरबाद होऊ शकते. मुंबईत अनेक ठिकाणी कारवाई सुरू आहेत. शाळा-कॉलेजजवळील २३६९ टपऱ्या फोडल्याचं गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी विधानपरिषदेत सांगितलं.
- विधानपरिषदेत ललित पाटील ड्रग्ज प्रकरणाचा विषय चर्चेत आला आहे. काँग्रेसचे आमदार यांनी ड्रग्ज प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांचा हात असू शकतो, असा संशय व्यक्त केला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात १० पोलिसांवर कारवाई कऱण्यात आल्याचं सांगितलं. त्यामध्ये ४ पोलीस बडतर्फ आणि ६ पोलीस निलंबित आहेत. कोकणात वाहून आलेल्या ड्रग्जवर पाकिस्तानचा शिक्का आहे. हे आंतरराष्ट्रीय ड्र्गज असल्याचा संशय गृहमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. ललित पाटील प्रकरणात कोणाही माफी मिळणार नाही, याची ग्वाही गृहमंत्री फडणवीस यांनी दिली.
- अवकाळीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी सरकार लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करण्याची शक्यता आहे. याबाबत मुख्यमंत्री शुक्रवारी घोषणा करणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सभागृहात सांगितले.
- शिंदे समिती पहिला अहवाल ३१ ऑक्टोबरला सादर करणार आहे. ही माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तारांकित प्रश्नावर दिली.