नागपूर : महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांना पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव सरकारने नामंजूर केला आहे. ज्यामुळे दीक्षित यांचा कार्यकाळ 15 मे रोजी संपुष्टात आला. मुदत वाढ न मिळाल्याने दीक्षित यांनी राज्याच्या वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांच्याकडे सोमवारी पदभार सोपविला आहे.
आठ वर्षांपासून दीक्षित यांच्याकडे मेट्रोचे नेतृत्व :गेल्या आठ वर्षांपासून दीक्षित यांच्याकडे मेट्रोचे नेतृत्व होते. 2014 मध्ये नागपूर मेट्रो सुरू करण्यासाठी नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्प स्थापन करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकल्पाचे नाव बदलून महामेट्रो असं करण्यात आलं. ब्रिजेश दीक्षित यांच्या कार्यकाळात नागपुरात 38 किलोमीटरच्या मेट्रो मार्ग कार्यान्वित झाला. 11 डिसेंबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर मेट्रोच्या संपूर्ण टप्प्याचे उद्घाटन आणि दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन करण्यात आले होते. दीक्षित यांच्या नेतृत्वात महा मेट्रो ने पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे कामही सुरू केले आहे.