नागपूर -महा-मेट्रोने विकसित केलेल्या मेट्रो निओ तंत्रज्ञानाचा वापर करून तेलंगणा राज्यातील वारंगल येथे मेट्रो प्रकल्प राबविणे शक्य होणार आहे. या प्रोजेक्टमुळे काकटिया नगरविकास प्राधिकरणचे (कुडा) सुमारे २ हजार कोटी रुपयांची बचत होणे अपेक्षित आहे. वारंगल, हणमकोंडा आणि काझीपेटसह त्याच्या आसपासच्या भागातील शहरांसाठी नियोजन प्राधिकरण आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा मेट्रो द्वारे) मुंबई शहर वगळून उर्वरित महाराष्ट्रतील मेट्रो रेल प्रकल्पाची जबाबदारी महा मेट्रोला देण्यात आली आहे. मात्र आता राज्याबाहेरील प्रोजेक्ट सुद्धा महामेट्रोला मिळू लागले आहेत.
नाशिक मेट्रोच्या धर्तीवर वारंगल मेट्रो प्रकल्प -
कुडाने काही महिन्यांपूर्वी महा मेट्रोला सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यास सांगितले होते. व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्या नेतृत्वात टीमने वारंगल मेट्रोचा डीपीआर तयार केला आहे. हे काम महा-मेट्रोने अवघ्या पाच महिन्यांत पूर्ण केले आहे. नागपूर आणि पुणे मेट्रोमध्ये काम केल्यामुळे महा मेट्रोला हा प्रकल्प मिळाला आहे. महा-मेट्रो आता महाराष्ट्रात तसेच बाहेरील प्रकल्प राबवित आहे. वारंगल मेट्रो निओची लांबी १५ कि.मी. आहे आणि सुमारे एक हजार कोटी रुपये खर्चून तयार केली जाईल. या प्रकल्पाची प्रति किमी किंमत ६० कोटी रुपये असण्याचा अनुमान लावण्यात आला आहे, त्याच तुलनेत पारंपरिक मेट्रोचा प्रत्येक किलोमीटर निर्माण करण्यासाठी १८० कोटी रुपये खर्च येतो. वारंगल येथे मेट्रो प्रकल्पाचा डीपीआर नाशिक मेट्रोच्या धर्तीवर तयार करण्यात आला आहे.
म्हणून वारंगल करीता मेट्रो- नियोचा पर्याय निवडवला -
वारंगल, हणमकोंडा आणि काझीपेट शहरांची एकूण लोकसंख्या २० लाख आहे. २० वर्षांनंतर म्हणजेच २०४१ मध्ये प्रत्येक दिशेने जाणारे ८ हजार प्रवासी अपेक्षित आहेत. अश्या परिस्थितीमध्ये पारंपरिक मेट्रोचा पर्याय उपयुक्त ठरला नसता म्हणून वारंगल करीता मेट्रो- नियोचा पर्याय निवडण्यात आल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले आहे. कुडाने यापूर्वीच तेलंगणा सरकारला डीपीआर सादर केला आहे, लवकरच तो डीपीआर भारत सरकारकडे पाठविण्याची अपेक्षा आहे.