नागपूर - यंदाचा उन्हाळा नागपुरात भीषण पाणी टंचाई घेऊन येणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पाण्याच्या नियोजनासंदर्भात विचारले असता त्यांनी जलसंकटाच्या परिस्थितीत नागपूर जिल्ह्याच्या मदतीला मध्य प्रदेश धावून येणार असल्याचे सांगितले. मध्य प्रदेशात चौराई धरण बांधल्यामुळे नागपूरला पाणीपुरवठा करणाऱ्या पेंच जलाशयात पाण्याची टक्केवारी घटायला सुरुवात झाली आहे.
उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण झाल्यास मध्यप्रदेश मदतीला येईल - चंद्रशेखर बावनकुळे - उन्हाळा
नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पाण्याच्या नियोजनासंदर्भात विचारले असता त्यांनी जलसंकटाच्या परिस्थितीत नागपूर जिल्ह्याच्या मदतीला मध्य प्रदेश धावून येणार असल्याचे सांगितले.
नागपुरात यंदाच्या उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मध्यप्रदेश सरकारने चौराई धरण बांधून पेंच जलाशयाला मिळणारे पाणी रोखले आहे. त्यामुळे पेंच जलाशयातील पाण्याची टक्केवारी आत्ताच घटायला सुरुवात झाली आहे. ज्यामुळे येत्या उन्हाळ्यात नागपूरकरांना भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागेल. जल संकटाचा सामना करण्याकरिता नागपूर महानगरपालिका, शासन आणि प्रशासनाने विविध उपाययोजना करायला सुरुवात केली आहे. नागपूरसाठी पाण्याची कमतरता भासणार नाही, असा त्यांचा दावा आहे.
जलसंकट निर्माण झालेच तर मध्य प्रदेश सरकार नागपूरला पाणी देण्याकरिता तयार असल्याचा शब्द मध्यप्रदेश सरकारने नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिला आहे, अशी माहिती स्व:त पालकमंत्री बावनकुळे यांनी दिली. चौराई धरणातील ५ टक्के पाणी नागपूरसाठी सोडावे यासाठी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहितीदेखील बावनकुळे यांनी दिली. यासंदर्भात एप्रिल महिन्याच्या अखेरीस मध्यप्रदेश सरकार सोबत पत्रव्यवहार केला जाणार आहे.