नागपूर - शहरातील कोराडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायाला मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यातील तिरोडा पोलीसांनी लूटमार प्रकरणात अटक केली आहे. दीपक निमोणे असे पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. या महिन्याच्या सुरूवातीला 4 आरोपींनी मध्यप्रदेश राज्याच्या बालाघाट जिल्ह्यातील तरोडा येथे हितेश सुधाकर पारधी या बकरी व्यावसायिकाच्या डोळ्यात लाल तिखटा टाकून त्याच्या जवळील ५४ हजार पाचशे रुपयांची रोखड लुटली होती.
नागपुरातील पोलीस शिपायाला लुटमारीच्या प्रकरणात मध्यप्रदेशात अटक - नागपूर पोलीस न्यूज
शहरातील कोराडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायाला मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यातील तिरोडा पोलीसांनी लूटमार प्रकरणात अटक केली आहे. दीपक निमोणे असे पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे.
आरोपींनी तक्रारदार हितेशचा पाठलाग सुरू केला होता. त्यानंतर जेव्हा हितेशने एटीएममधून पैसे काढले तेव्हा संधीचा गैरफायदा घेऊन चारही आरोपींनी योजनाबद्ध पद्धतीने लुटीची घटना घडवून आणली आहे. ओळख लपवण्यासाठी आरोपींनी कारच्या नंबर प्लेट्स वर चिखल माखल्याची माहिती देखील उघड झाली आहे. या प्रकरणाची तक्रार दाखल होताच तिरोडा पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला होता. आरोपींना पकडण्यासाठी मध्यप्रदेश पोलिसांनी दहा हजार रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते.
दरम्यान, चार संशयित परिसरात फिरत असल्याची माहिती समोर येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. तेव्हा सर्व आरोपींनी गुन्हा कबुल केला आहे. महत्वाचे म्हणजे अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये एक आरोपी हा नागपूर शहरातील कोराडी पोलीस ठाण्यात कार्यरत शिपाई आहे. त्याचे नाव दीपक निमोणे असे आहे. मध्यप्रदेश पोलिसांच्या माहिती नुसार अटक करण्यात आलेल्या चार आरोपींपैकी एकाची प्रेयसी ही तुमसर भागात राहते. पैसे लुटल्यानंतर हे सर्व आरोपी त्या भागात फिरायला गेले होते. त्याच दरम्यान या आरोपींना अटक करण्यात आली आहे.