नागपूर : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आज सकाळी नागपूरच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात दाखल झाले. त्यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली आहे. सरसंघचालक मोहन भागवत आणि मुशिवराज सिंह चौहान यांच्यामध्ये सुमारे एक तासभर बंद द्वार चर्चा झाली आहे. आगामी काळात मध्यप्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. याशिवाय संघटनात्मक पक्षबंधणी या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर चर्चा: मध्यप्रदेशात या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहे. शिवराज सिंह चौहान गेल्या १८ वर्षांपासून मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहे. निवडणुकीच्या आधी संघटन आणि पक्ष मजबूत करण्याच्या उद्देशानेच शिवराज सिंह चौहान सरसंघचालकांचे मार्गदर्शन घेण्यासाठी संघ मुख्यालयात हजेरी लावल्याचे सांगितले जात आहे. मात्र, दोघांमध्ये नेमके काय बोलणे झाले याची अधिकृत माहिती कळू शकलेली नाही. सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत सखोल चर्चा झाल्यानंतर शिवराज सिंह चौहान पुढील कार्यक्रमाला जाण्यासाठी बाहेर पडले. यावेळी त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
सेमीफायनलची तयारी?: देशातील नऊ राज्यांमध्ये यावर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. पुढील वर्षी म्हणजे २०२४ होणाऱ्या लोकसभा निवडणुक आधी ‘सेमी फायनल’ म्हणून या नऊ राज्यांमध्ये होत अललेल्या निवडणुकांकडे बघितले जात आहे. ज्या नऊ राज्यात निवडणूका होणार आहेत, त्यापैकी मध्यप्रदेश राज्य भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असल्याने शिवराजसिंह चव्हाण आतापासूनच कामाला लागले असल्याची चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणूकीच्या उद्देश्याने आतापासूनच रणनीती आखली असून त्याची अंमालबजावणीला सुरूवात झाली असल्याचे सांगितले जात आहे.