नागपूर- उपराजधानी नागपुरात लुसीच्या वाढदिवसाची चांगलीच खमंग चर्चा सुरू आहे. यापूर्वी नागपुरात कुणाच्याही वाढदिवसाची इतकी चर्चा झाली नसेल तेवढी चर्चा लुसीच्या वाढदिवसाची सुरू आहे. लुसीच्या दहाव्या वाढदिवसाच्या निमित्याने शुभेच्छा देणारा एक फोटो समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे. ज्यामुळे नागपुरातील प्रत्येकाला लुसीच्या ओळख झाली आहे.
ही लुसी म्हणजे रेवतकर कुटुंबातील महत्त्वाची सदस्यच, जणू त्यांच्या अपत्या प्रमाणेच आहे. रेवतकर कुटुंबीय आपल्या मुलांवर जेवढे प्रेम करतात, त्यापेक्षा तीळभर जास्तच प्रेम लुसीवर करतात. ही लुसी म्हणजे एक श्वान जरी असले तरी ती रेवतकर कुटुंबाच्या सुखदुःखाची सोबती आहे. म्हणूनच त्यांनी लुसीचा दहावा वाढदिवस जोरदार पद्धतीने साजरा केला. लुसीच्या वाढदिवसानिमित्ताने घरात विशेष सजावट करण्यात आली. एवढेच नाही तर भला मोठा केक सुद्धा मागवण्यात आला होता. जंगी सोहळा साजरा करून रेवतकर कुटुंबीयांनी लुसीचा वाढदिवस साजरा केला.