नागपूर - उच्चशिक्षित झाल्यानंतर झटपट श्रीमंत होण्याची इच्छा पूर्ण करण्याच्या उद्देशाने घरफोड्या करणाऱ्या एका प्रेमी युगुलाला नागपूरच्या मानकापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रेमी युगुलाची चोरी करण्याची पद्धत जगावेगळी असल्याने त्यांना अटक करणाऱ्या पोलिसांना कधीही त्यांच्यावर संशय आला नाही. घरफोड्या करत असल्याचा संशय कुणालाही येऊ नये यासाठी हे प्रेमी युगुल चक्क कारमधून फिरून घरफोड्या करत असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक करून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे.
हेही वाचा - औषधाने मुले होतात अस सांगून दाम्पत्याला गंडवले; 3 बोगस डॉक्टर गजाआड
पोलिसांनी अटक केलेल्या प्रेमी युगुलामध्ये शैलेश वसंता डुंभरे आणि त्याची प्रेयसी प्रियाचा समावेश आहे. दोघेही लिव्हइनमध्ये राहत असल्याचे समोर आले आहे.
आरोपी शैलेश डुंभरे हा एका कंपनीत चांगल्या पदावर कार्यरत होता. झटपट श्रीमंत होण्याच्या नादात त्याने नोकरी सोडून घरफोडीचे काम सुरू केले होते. या कामात आरोपी शैलेशने त्याची प्रेयसी प्रियालासुद्धा सहभागी करून घेतले होते. प्रिया ही अमरावती जिल्ह्यातील रहिवाशी आहे. ती शिक्षणासाठी नागपुरात राहते. शैलेश आणि प्रियामध्ये गेल्या काही महिन्यांपासून दोघांमध्ये प्रेम संबंध होते. दोघेही घरफोडीच्या कामात पार्टनर झाल्याने या दोघांनी लिव्हइनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. या दोघांनी गोरेवाडा परिसरात एक बंगला भाड्याने घेतला होता. चोरी कशी करायची ज्यामुळे कुणाला संशय येणार नाही, हे जाणून घेण्यासाठी त्यांनी चक्क यू-ट्युबवरून घरफोडीचे प्रशिक्षण घेतल्याचे समोर आले आहे.