नागपूर Congress Ramesh Chennithala : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या पीसीसी एक्झिक्यूटिव्ह कमिटीनं महाराष्ट्रातील एकूण 6 विभागामध्ये येत्या काळात काँग्रेसच्या बैठकांचं आयोजन केलंय. त्यापैकी पहिली बैठक ही आज अमरावतीत होणार आहे. काँग्रेस पक्षाचं संघटन मजबूत व शक्तिशाली बनवण्यासाठी आणि लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी बैठकांचं आयोजन करण्यात येत असल्याची माहिती काँग्रेसचे नेता आणि महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी दिलीय. आज ते नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलत होते.
महाविकास आघाडीतील जागा वाटप अंतिम टप्प्यात : "लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांसोबत चर्चा झालेली आहे. येणाऱ्या काळात कोणाला किती जागा दिल्या जातील यावर शिक्कामोर्तब होईल. त्यानुसार आम्ही निवडणुकांना पुढं जाऊ. जागा वाटपाच्या संदर्भात बऱ्यापैकी सहमती झालेली आहे. येणाऱ्या काही दिवसांत लवकरात लवकर अंतिम यादी जाहीर करू" अशी माहिती काँग्रेसचे नेते व महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी दिलीय.
गडचिरोलीत होईल बैठक :रमेश चेन्निथला म्हणाले," काँग्रेस पहिल्यांदाच आदिवासी बहुल भागातील गडचिरोलीमध्ये जाऊन बैठक घेणार आहे. शहरात नेहमीच बैठका होतात. म्हणून यावेळेस ग्रामीण भागात जात आहोत. नागपूर विभागाची बैठक गडचिरोलीमध्ये होणार आहे. आम्ही सत्तेसाठी लढत नाही तर एक आदर्श आणि विचारासाठी आम्ही पक्षात काम करत असतो. पण, काही लोक पद नसले की निघून जातात. जाणाऱ्यांमुळे काँग्रेस पक्षाला काहीही नुकसान होणार नाही. महाराष्ट्र काँग्रेस सक्षम आहे."