नागपूर - राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचे काम केले आहे. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी सरसकट 2 लाखाच्या कर्जमाफीची घोषणा केली. महात्मा फुले योजनेंतर्गत ही कर्जमाफी मिळणार आहे. योजनेचा पहिला टप्पा शेतकऱ्यांना मार्चमध्ये मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज सभागृहात सांगितले आहे. यासोबतच गोरगरिबांना 10 रुपयांत शिव-भोजन देणार, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी आज (शनिवारी) विधानसभेत घोषणा केली.
ज्या शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे कर्ज 30 सप्टेंबर 2019 पर्यंत थकीत आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्त करत असल्याचे मुख्यमंत्री यांनी विधानसभेत जाहीर केले. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत ही कर्जमाफी दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. ही योजना मार्च २०२० पासून सुरु होणार आहे. सर्व अटी- शर्तीविरहीत ही कर्जमाफी करणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या थेट कर्ज खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे. संपूर्ण योजनेत पारदर्शकता राहील, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.
हेही वाचा -विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज अंतिम दिवस; शेतकऱ्यांना काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष