नागपूर -भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांना राज्य सरकारने वाऱ्यावर सोडल्याचा आरोप विधानपरिषदेचे आमदार परिणय फुके यांनी केला आहे. दोन दिवसांपूर्वी गोंदिया येथील कोविड हॉस्पिटलमधील ऑक्सिजन संपत असल्याची सूचना मिळाल्यानंतरदेखील जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतीही तत्परता दाखवली नाही. मात्र, जेव्हा केवळ दोन तास पुरेल इतका प्राणवायू शिल्लक होता, त्यावेळी त्यांना वारंवार सांगितल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हालचाली करायला सुरुवात केली. ज्यामुळे शेकडो रुग्णांचे जीव धोक्यात आला होता, असा आरोप फुके यांनी केला आहे.
मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधून ऑक्सिजनचा पुरवठा -
गोंदियाच्या सरकारी रुग्णालयात परवा रात्री ऑक्सिजनचा साठा जवळजवळ संपुष्टात आला होता. अवघ्या दोन तास पुरेल इतकाच ऑक्सिजन साठा शिल्लक असताना तिथल्या अधिकाऱ्यांनी आणि डॉक्टरांनी रात्री उशिरा मला फोन केला. यावेळ त्यांनी ऑक्सिजन साठा संपत असल्याचे सांगितले. तसचे लवकर ऑक्सिजन उपलब्ध झाले नाही, तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. ऑक्सिजन संपल्यास शेकडो रुग्णांचे जीव धोक्यात येणार असल्याच्या कल्पनेने अंगावर काटा उभा राहिला होता. ही माहिती समजताच भंडारा जिल्ह्यातील सनफ्लॅग कारखान्यातून आणि मध्यप्रदेशच्या बालाघाट आणि छत्तीसगड येथील रायपूरमधून ऑक्सिजनचा साठा बोलवण्यात आला. अगदी वेळेत प्राणवायू पोहोचल्याने अनेकांचे प्राण वाचल्याची प्रतिक्रिया आमदार परिणय फुके यांनी दिली.