नागपूर :Kunbi OBC Protest : मराठा समाजाला कुणबी या जातीचे प्रमाणपत्र (Kunbi Certificate) देऊन ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण देण्यात येईल, या अनुषंगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, विदर्भातील सर्व शाखीय कुणबी समाजासह ओबीसींकडूनही याला तीव्र विरोध सुरू करण्यात येत आहे. रविवारपासून नागपूर येथील संविधान चौक येथे सर्वशाखीय कुणबी समाज आणि ओबीसींकडून आंदोलन सुरू करण्यात आले. सर्वशाखीय कुणबी, ओबीसी कृती समितीच्या नेतृत्वात बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येत आहे. यामध्ये भाजपाचे नेते आशिष देशमुख यांच्यासह विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) आणि सर्वपक्षीय नेते यांची उपस्थित होती.
बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात : मराठा समाजाला कुणबी समाजाचे प्रमाणपत्र दिले जाईल यासंदर्भात जीआर निघाल्यानंतर मराठा विरुद्ध कुणबी असा संघर्ष (Maratha Vs Kunbi) पेटणार अशी स्पष्ट चिन्ह आता दिसू लागली आहेत. मराठा समाजाला कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देण्यास कुणबी समाजाने तीव्र आक्षेप घेतला. याविरोधात आता आंदोलनाची भूमिका घेण्यात आली. नागपूरच्या संविधान चौकात रविवारपासून बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात झाली आहे. या आंदोलनासाठी विदर्भातील सर्वशाखीय कुणबी, ओबीसी आंदोलन कृती समिती तयार करण्यात आली. यामध्ये सर्व कुणबी संघटनेचे आणि ओबीसी संघटनेचे प्रतिनिधी सहभागी आहेत. तसेच आंदोलन पूर्णतः निष्पक्ष व सामाजिक हितासाठी आहे हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.
बैठकीत झाला निर्णय :सर्वशाखीय कुणबी समाज प्रतिनिधींची बैठक झाली. बैठकीत समाज संघटनांच्या प्रतिनिधी आणि राजकीय पक्षांतील कुणबी नेते उपस्थित होते. सुमारे तीन तास चाललेल्या या बैठकीत मराठा समाजाला कुणबीचे प्रमाणपत्र देऊन ओबीसींमध्ये सहभागी करण्यास कडाडून तीव्र विरोध करण्यात आला आहे. सरकारने असे कुठलेही पाऊल उचलले तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.