नागपूर- उपराजधानी नागपुरात कोरोनाचा शिरकाव झाला आणि सगळ्याच गोष्टींना ब्रेक लागला. कोरोनामुळे जणू आपला देश आहे त्याच स्थितीत अडकून पडला होता. या काळात सामान्य नागरिकांची झालेली अवस्था ही पिढी तरी कधीही विसरू शकणार नाही. पण, जे कोरोना योद्धा सर्वात पुढे येऊन लढत होते त्यांच्या कुटुंबीयांना तरी कुणाचा आधार होता? अशा वेळेत एकमेकांच्या मदतीने आलेले संकट दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न नागपूर पोलिसांनी केला.
शहराच्या सीमेवर असलेल्या कोराडी पोलिसांनी, तर एक नवा आदर्शच घालून दिला. पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी, जे फिल्डवर तैनात आहेत त्यांना भाजी आणि फळांसाठी कुठेही वणवण भटकावे लागू नये या करीता कोराडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वजीर शेख यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात परसबाग फुलवली. मनात काही करून दाखवण्याची इच्छा असेल तर ते काम मार्गी लागते, या सूत्राचा अवलंब करतच शेख यांनी हा उपक्रम राबवला. त्यांच्या या उपक्रमामुळे ठाण्यात येणाऱ्या प्रत्येकाला सुखद धक्का मिळत आहे.
नागपूर शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर कोराडी पोलीस ठाणे आहे. बाहेरून बघायला हे पोलीस स्टेशन सगळ्या पोलीस स्टेशन सारखेच दिसते. पण, आपण आत प्रवेश केला तर पोलीस स्टेशनचा परिसर जरा हटके आणि वेगळा आहे. प्रवेश केल्यापासून दोन्ही बाजूने सुंदर रंगरंगोटी केलेली गाड्यांची चाके दिसतात. आजूबाजूची सगळी हिरवळ आणि झाडे पोलीस ठाण्यात येणाऱ्यांना आकर्षित करते.