नागपूर - सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी मराठमोळ्या न्यायमूर्ती शरद बोबडे यांची निवड होण्याची शक्यता आहे. विद्यमान सरन्यायाधीश रंजन गोगोई हे 17 नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत. त्यांचे उत्तराधिकारी म्हणून बोबडे यांच्या नावाची शिफारस न्यायमूर्ती गोगोई यांनी कायदा मंत्रालयाकडे केली आहे. सरन्यायाधीशपदी बोबडे यांची नियुक्ती झाल्यास बोबडे सर्वोच्च न्यायालयाचे ४७ वे सरन्यायाधीश ठरतील.
नागपूरच्या आकाशवाणी चौकातील याच घरी न्यायमूर्ती शरद बोबडे यांचा जन्म २४ एप्रिल १९५६ रोजी वकील कुटुंबात झाला. न्यायमूर्ती बोबडे यांचे वडील अरविंद बोबडे यांनी महाराष्ट्राचे अॅडव्होकेट जनरल पद भूषवले आहे. नागपूर विद्यापीठातून बोबडे यांनी कायद्याची पदवी घेतली. १९७८ साली ते महाराष्ट्र बार कौन्सिलचे सदस्य बनले आणि १९९८ मध्ये वरिष्ठ अधिवक्ता म्हणून त्यांची नेमणूक झाली. यानंतर १९९८ साली त्यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश पदावर निवड करण्यात आली. १६ ऑक्टोबर २०१२ साली ते मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले.
हेही वाचा -विधानसभा निवडणूक : नागपुरात काँग्रेसचे अस्तित्व टिकणार का?
सर्वोच्च न्यायालयात सध्या रंजन गोगोई नंतर बोबडे हे सगळ्यात ज्येष्ठ आहेत. नागपूर व महाराष्ट्राकरिता ही अत्यंत गौरवाची बाब असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती व बोबडे कुटुंबियांचे स्नेही विकास शिरपूरकर सांगतात. सम्यक बुद्धिमत्तेचे व स्थितप्रज्ञ असे न्यायमूर्ती शरद बोबडे हे तल्लख बुद्धिमत्तेचे व बॅलन्स वकील असल्याचेही शिरपूरकर सांगतात.