नांदेड - भारतीय जनता पक्षाच्या वतीने समाजात जो अपप्रचार पसरविण्यात येत आहे, त्यास सडेतोड उत्तर देण्याची जबाबदारी काँग्रेस सोशल मीडियाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. शहरातील शंकरराव चव्हाण मेमोरीयल येथे आज काँग्रेस सोशल मीडियाच्या नवनियुक्त पदाधिकार्यांचा अशोक चव्हाण यांच्या हस्ते अभिनंदन पत्र देऊन गौरव करण्यात आला.
अभ्यासपूर्ण माहितीतून सडेतोड उत्तर देणे गरजेचे
अशोक चव्हाण म्हणाले की, वर्तमानपत्रापेक्षाही अधिक गतीने माहिती पोहचविण्याचे साधन सोशल मीडिया आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती पोहचविताना वास्तव माहिती लोकांपर्यंत पोहचवून विश्वासाहर्ता निर्माण करणे गरजेचे आहे. भाजपसह विरोधकांच्या अपप्रचाराला अभ्यासपूर्ण माहितीतून सडेतोड उत्तर देणे गरजेचे आहे. या समवेतच समाजात अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात. या गोष्टीही समाजात पोहोचविल्या पाहिजेत. जनतेपर्यंत माहिती पोहचविण्यासाठी सोशल मीडियाच्या पदाधिकार्यांनी अपडेट राहणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.
तालुका निहाय सोशल मीडिया पदाधिकार्यांची नियुक्ती करावी
यावेळी विधान परिषदेतील काँग्रेसचे आमदार अमरनाथ राजूरकर म्हणाले की, विधानसभा निहाय पदाधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली. लवकरच तालुका निहाय काँग्रेस सोशल मीडिया पदाधिकार्यांची नियुक्ती करण्यात यावी. सोशल मीडियातील पदाधिकार्यांना लोकांपर्यंत योग्य व खरी माहिती पोहचविण्यासाठी त्यांना अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. सोशल मीडियाची टीम सक्षम झाल्यास निश्चितच काँग्रेस पक्षाला बळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.