नागपूर- भारतात आज प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. मात्र, नागपूरच्या एका दृष्टीहीन चिमुकलीने आजचा गणराज्य दिवस अतिशय वेगळ्या पद्धतीने साजरा केला आहे. ईश्वरी पांडे असे या ११ वर्षीय चिमुकलीचे नाव आहे. देशावर असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी आज ईश्वरीने अंबाझरी तलावात तब्बल दोन किलोमीटर अंतर पोहून तलावाच्या मध्य भागी ध्वजारोहण करण्याची कामगिरी पार पडली आहे. तब्बल अडीच तास पोहून ईश्वरीने अंबाझरी तलावाच्या अगदी मध्यभागी असलेल्या खांबावर राष्ट्रध्वज फडकवण्याचा मान मिळवला आहे. महत्त्वाचे म्हणजे या पूर्वी कोणत्याही दृष्टी नसलेल्या व्यक्तीने तलावाच्या इतक्या आत जाण्याचा प्रयत्नदेखील केलेला नाही. त्यामुळे या प्रकारात ही कामगिरी करणारी ईश्वरी ही पहिली दृष्टी नसलेली जलतरणपटू ठरली आहे.
नागपुरकरांनी केले ईश्वरीचे स्वागत -
ईश्वरी पांडे या चिमुकलीने आज समाजापुढे एक नवा आदर्श घालून दिलेला आहे. जगातील डोळस व्यक्तींना जे जमले नाही, ते या चिमुकलीने करून दाखवले आहे. सकाळी ज्यावेळी तापमान १२ ते १३ अंश सेल्सिअस होते. त्यामुळे तलावातील पाणी प्रचंड गार होते. त्यावेळी ईश्वरीन प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर ही ऐतिहासिक कामगिरी पूर्ण केली आहे. ज्यावेळी ती परत आली तेव्हा तलावावर उपस्थित असलेल्या प्रत्येकाने ईश्वरीचे टाळ्या वाजवून स्वागत केले.