महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपुरात साडे तीनशे इंटर्न डॉक्टर्स संपावर; कोविड भत्त्यासह विविध सोयी सुविधांची मागणी - Intern Doctor Strike Nagpur News

नागपुरात मेडिकल कॉलेजमधील इंटर्न डॉक्टरांनी कोविड काळात वेगळा भत्ता यासोबत काही सोयी सुविधांच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. नागपूरचे शासकीय मेडिकल कॉलेज, तसेच मेयोचे जवळपास साडे तीनशे विद्यार्थी नागपुरात संपावर आहेत.

Intern Nagpur covid allowance demand
इंटर्न डॉक्टर संप नागपूर बातमी

By

Published : May 4, 2021, 3:46 PM IST

नागपूर - नागपूरसह राज्यातील अनेक मेडिकल कॉलेजमधील इंटर्न डॉक्टरांनी कोविड काळात वेगळा भत्ता यासोबत काही सोयी सुविधांच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. नागपूरचे शासकीय मेडिकल कॉलेज, तसेच मेयोचे जवळपास साडे तीनशे विद्यार्थी नागपुरात संपावर आहेत. मागणी लिखित स्वरुपात मान्य करावी, असा आग्रह देखील इंटर्न्सनी धरला आहे.

माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी, इंटर्न डॉक्टर प्रत्युश साबळे आणि इंटर्न डॉक्टर स्नेहल घाटे

हेही वाचा -कोरोना रुग्णांच्या उपचारामध्ये पोर्टेबल व्हेंटिलेटरची उपयुक्तता तपासावी - पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

राज्यातील २०१६ च्या बॅचच्या 3 हजार इंटर्न डॉक्टरांनी एकत्र निर्णय घेत संप अवलंबला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत कोविडच्या ड्युटीवर रुजू होणार नाही, असे म्हणत इंटर्न्सनी नागपूरच्या शासकीय माहाविद्यालयात डीन ऑफिससमोर आंदोलन सुरू केले आहे. जसे मुंबई आणि पुण्याच्या इंटर्न डॉक्टर्सना मागील वर्षी 50 हजार रुपये कोविड काळाचे मानधन दिले, त्याच धर्तीवर मानधन द्या, अशी मागणी इंटर्न डॉक्टर्सनी केली. त्यांची इंटर्नशीप सुरू होणार होती, पण पहिल्याच दिवशी त्यांनी आंदोलन करून हा पवित्रा घेतला.

या आहेत मागण्या

कोविड भत्त्यात (मानधन) दिवसाला 300 रुपये जेवण, प्रवास आणि प्रोत्साहन भत्ता यासोबतच कोरोना वॉर्डात ड्युटी केल्यानंतर 14 दिवसांनी सुपर स्प्रेडर बनू नये म्हणून क्वारंटाईन राहण्याची सोय करणे. तसेच, या काळात आजारी पडल्यास उपचाराचा खर्च शासनाने उचलावा, शासनाने विमा कवच प्रदान करावे, या मागण्या करण्यात आल्या.

परिचारिकेचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शासनाकडून 1 हजार रुपये दिवस भत्ता दिला जात आहे, पण महाराष्ट्रातील इंटर्न्सना सद्यस्थितीला कोणताही भत्ता मिळत नाही. केवळ तुटपुंज्या विद्यावेतनावर काम करावे लागत आहे. त्या अनुषंगाने अधिष्ठाता, मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी यांना सप्टेंबर २०२० मध्ये निवेदन दिले होते, पण अजून त्यावर काही कारवाई करण्यात आली नसल्याने आज निवेदन देऊन संप सुरू केला. जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आम्ही संप मागे न घेता आंदोलन चालू ठेवणार असल्याचे इंटर्न डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा -सर्व दहन घाटांवर नि:शुल्क लाकडांसंदर्भात फलक लावा, आरोग्य समिती सभापती यांचे निर्देश

ABOUT THE AUTHOR

...view details