मुंबई/नागपूर - समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका (Samruddhi Mahamarg Accident) थांबण्याचे नाव घेत नाही. महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ज्या समृद्धी महामार्गाची ओळख आहे, तोच मार्ग आता मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाल्यापासून बुलडाणा जिल्ह्यामधून (Buldhana Bus Accident) जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर सर्वाधिक अपघात झाले आहेत.
'समृद्धी'वरील मृत्यूंचा आकडा - डिसेंबर 2022 ते जून 2023 म्हणजे 6 महिने या कालावधीत 368 पेक्षा अधिक अपघातांची नोंद झाली आहे. या अपघातात जवळपास 70 पेक्षा जास्त जणांचा जीव गेला तर 150 हून अधिक गंभीर जखमी झाले आहेत. पण यातले सर्वाधिक अपघात हे बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर झाले असल्याचे समोर आले आहे. चालकाच्या निष्काळजीपणामुळे मागील सहा महिन्यात 106 अपघात झाले आहेत. त्यामुळे हा समृद्धी महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येत आहे.
बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक अपघात - डिसेंबर 2022 ला महामार्ग सुरू झाल्यापासून बुलडाणा जिल्ह्यात जवळपास 180 अपघात झाले आहेत. त्यापाठोपाठ जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक अपघात झाले आहेत. समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील बुलडाणा जिल्हा वगळता इतर भागात अपघाताचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातच अपघाताचे प्रमाण अधिक का आहे याचे कारणे शोधण्याची गरज आता निर्माण झाली आहे.
'महामार्ग संमोहन' म्हणजे काय? -समृद्धीवरील अपघातासाठी 'महामार्ग संमोहन' जबाबदार असल्याचा दावा करण्यात आला आहे. एखादा महामार्ग सरळ एका रेषेत असतो. त्यात जास्ती वळणे नसतात. त्या महामार्गावर तुमची गाडी सरळ एकमार्गे एकाच वेगात अनेक तास धावत असते. अशा परिस्थितीमध्ये तुमच्या शरीराची हालचाल स्थिर होते, तुमचा मेंदुर सक्रिय नसतो. त्या स्थितीला 'महामार्ग संमोहन' असे म्हणतात. हा प्रकार समृद्धी महामार्गावर चालकांसोबत घडत आहे. नागपूरच्या व्हीएनआयटी संस्थेच्या सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेच्या ट्रांसपोस्टेशन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनात ही माहिती पुढे आली आहे.
समृद्धीवरील अपघातांची कारणे - लेन कटिंग हे समृद्धी महामार्गावर अपघाचे एक प्रमुख कारण आहे. समृद्धी महामार्गावर वाहने वेगमर्यादा ओलांडत असल्याचे पुढे आले आहे. तसेच ट्रकचालक हे लेन चेंज करताना नियमांचे पालन करत नसल्याचेही समोर आले आहे. कमजोर किंवा कालबाह्य टायर वापरले जात असल्याने सिमेंट रोडवर टायर फुटणे हे देखील अपघाताला कारणीभूत ठरत आहे. चालकाचे लक्ष विचलित झाल्यानेही अनेक अपघात झाले आहेत. वाहन चालवताना अनेकजण मोबाईलचा वापर करतात. तसेच चालकाला डुलकी लागणे हे देखील कारण अपघाताला आमंत्रण देत असल्याचे समोर आले आहे.
अपघात टाळण्यासाठी काय केले पाहिजे?: समृद्धी महामार्गावर होत असलेल्या अपघातांसंदर्भात बोलताना कम्युनिटी इम्पॅक्ट युनायटेड रस्ता सुरक्षा संस्थेचे व्हॉईस प्रेसिडेंट अजय गोवले म्हणाले की, समृद्धी महामार्गावर होणारे अपघात ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. राज्य सरकारने या अपघातांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी रस्त्यावर काही अंतरावर विश्रांती थांबे तयार करणे आवश्यक आहे. वाहन चालकांना विश्रांती मिळत नाही आणि दूरवर असलेल्या रस्त्यांवर अन्य काहीही नसल्याने वाहकांना वेगावर नियंत्रण ठेवता येत नाही. तसेच रस्त्यावर तोच तोचपणा आल्याने वाहकांना एक प्रकारचा बधिरपणा येतो आणि त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अतिवेगामुळे अपघात होत आहेत. राज्य सरकारने यासंदर्भात दखल घेऊन पोलीस चौकी आणि विश्रांती थांबे तयार करायला पाहिजे, अशी मागणी गोवले यांनी केली आहे.
समृद्धी महामार्गावर होणारे अपघात ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. राज्य सरकारने या अपघातांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी रस्त्यावर काही अंतरावर विश्रांती थांबे तयार करणे आवश्यक आहे - कम्युनिटी इम्पॅक्ट युनायटेड रस्ता सुरक्षा संस्थेचे व्हॉईस प्रेसिडेंट अजय गोवले
अपघाताची आणखी कारणे - महामार्ग पोलिसांनी या अपघातांमागील कारणे शोधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये सर्वाधिक १०४ अपघात डुलकी लागल्याने किंवा शेकडो किमीचा सलग प्रवास करून थकल्याने घडले आहेत. ८१ अपघात हे टायर फुटल्याने घडले असून, उष्ण तापमान आणि अतिवेग यामुळे घर्षण होऊन टायरफुटीच्या घटना घडत असल्याचे म्हटले जात आहे. अतिवेगामुळे ७२, प्राणी मध्ये आल्याने १८, तांत्रिक बिघाडामुळे १६, ब्रेक डाऊन झाल्याने १४; तर इतर काही कारणांमुळे ७४ अपघात घडल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.