नागपूर - गेल्या वर्षी पावसाळ्यात नागपूरकरांनी पावसाचा हाहाकार अनुभवला होता. जागो-जागी पावसाचे पाणी तुंबल्याने शेकडो नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. यावर्षी सुद्धा तीच परिस्थिती नागपूरकरांवर ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, पावसाळा तोंडावर आला तरी नालेसफाईचे काम पूर्ण झाले नाही.
पावसाळा आला तरी नागपूरमध्ये नाले सफाईची कामे अपूर्ण - incomplete
नागपूर महानगर पालिकेने सुमारे महिनाभरापूर्वी नाले सफाईला सुरूवात केली आहे. मात्र, अद्यापही नाले सफाई पूर्ण झाली नाहीत. यावर्षी सुद्धा गेल्यावर्षीसारखी परिस्थिती नागपूरकरांवर ओढवण्याची शक्यता आहे.
नागपूर महानगर पालिकेने सुमारे महिनाभरापूर्वी नाले सफाईला सुरूवात केली आहे. मात्र, अद्यापही नाले सफाई पूर्ण झाली नाहीत. यावर्षी सुद्धा गेल्यावर्षीसारखी परिस्थिती नागपूरकरांवर ओढवण्याची शक्यता आहे. ज्या वेगाने शहराचे क्षेत्रफळ वाढत आहे ते बघता मूलभूत सुविधांचा अभाव नागपुरात कायमच दिसून येतो. कधी नव्हे ते यावर्षी नागपूरकर पिण्याच्या पाण्यासाठी भटकताना दिसत आहेत. उन्हाळ्याची सांगता होण्याचा मुहूर्त जवळ येत असला तरी पावसाळ्याची भीती देखील सर्वसामान्य नागरिकांच्या मनात आहे. कारण, गेल्यावर्षी नागपूरकरांनी पावसाचा जो अनुभव घेतला होता तो यापूर्वी कधीही त्यांच्या वाटेला आला नव्हता. गेल्या वर्षी झालेल्या अवघ्या काही तासांच्या मुसळधार पावसाने शहराच्या सीमावर्ती भागात राहणाऱ्या अनेकांचा संसार वाहून गेला होता. एवढंच काय तर नागपुरात सुरू असलेले विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनसुद्धा पावसामुळे काही काळ ठप्प झाले होते.
यावर्षी नागपूर महानगर पालिकेने जून महिन्याच्या सुरूवातीलाच नाले सफाईचे अभियान हाती घेतले होते. परंतू, अद्यापही नाले सफाई पूर्ण झालेली नाही. तर दुसरीकडे महापौर नंदा जीचकार या मान्सूनपूर्वची पूर्ण तयारी झाली असल्याचा दावा करत आहेत. नाले सफाईच्या बाबतीत महापौर कितीही दावा करत असल्या तरी काम अद्यापही बरेच शिल्लक आहे. त्यामुळे यावर्षीसुद्धा तीच परिस्थिती नागपूरकरांवर ओढवण्याची शक्यता आहे.