नागपूर- सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या नागपूर येथील वास्तूचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नागपूर हे एज्युकेशन हब व्हावे ही इच्छा होती. त्या दिशेने पहिले पाऊल टाकले असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
आंतराष्ट्रीय दर्जाच्या सिम्बॉयसिस विद्यापीठचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन नागपूर शहराच्या वाठोडा परिसरातील ७५ एकर जागेवर शैक्षणिक संकुलाची निर्मिती करण्यात आली आहे. ७५ एकर जागेवर १० लाख चौरस फुटाचे बांधकाम करण्यात आले आहे. याठिकाणी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, सिम्बॉयसिस ऑफ लॉ स्कुल आणि सिम्बॉयसिस स्कुल ऑफ प्लॅनिंग अँड डिझाइन हे ३ शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. तसेच विद्यापीठात २५ टक्के जागा या नागपुरातील विद्यार्थ्यांसाठी आरक्षित करण्यात आल्या असून विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात १५ टक्के सूट देण्यात आली आहे.
यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, १ रुपये दराने महापालिकेने ३० वर्षाकरिता ही जागा सिम्बॉयसिसला दिली आहे. त्याच्या बदल्यात २५ टक्का जागा नागपूरकरांसाठी आरक्षित करण्यात आल्या असून शैक्षणिक शुल्कात १५ टक्के सूट देण्याचा करार झाला आहे. वाठोडा परिसरातच १२० एकर जागेवर जागतिक स्तराचे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तयार करणार असल्याची घोषणा यावेळी गडकरी यांनी केली.
यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील काही महत्त्वाच्या मुद्यांवर जोर दिला. ते म्हणाले की, ज्या ठिकाणी चांगले संस्था आहेत तिथे प्रगती होते. मानवी संसाधन निर्माण करणे विकासाचे लक्षण आहे. देशातील सर्व प्रतिष्ठित संस्था नागपुरात आले आहेत. नागपूरला शैक्षणिक हब म्हणून विकसित करताना एव्हीएशन हब म्हणून देखील विकसित करायचे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते.