नागपूर - गेल्या २४ तासांत राज्याची उपराजधानी नागपूर जिल्ह्यात ३ हजार ७५८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. महत्वाचे म्हणजे, आजही नागपुरात कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या पन्नाशीच्या पार गेली आहे. २४ तासांत नागपूरमध्ये तब्बल ५४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आज ३ हजार ३०५ रुग्णांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे.
हेही वाचा -श्रद्धानंद अनाथालयातील विद्यार्थिनींच्या निश्चयाची 'गुढी'
जिल्ह्यात ३ हजार ७५८ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने एकूण कोरोनाबधित अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ४१ हजार ५२९ इतकी झाली आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये १ हजार १०० रुग्ण हे नागपूर जिल्ह्याच्या विविध तालुक्यांतील आहेत, तर २ हजार ६५२ रुग्ण हे नागपूर महानगरपालिकेच्या दहा झोन अंतर्गत येणाऱ्या विविध भागांतील आहेत. आज जिल्ह्यात १४ हजार ६७६ टेस्ट करण्यात आल्या, ज्यामध्ये ९ हजार ४८७ आरटीपीसीआर, तर ५ हजार ८९ अँटिजेन टेस्टचा समावेश आहे. आज ५४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये २१ रुग्ण ग्रामीण नागपूरचे, तर २७ रुग्ण शहरातील आहेत. या शिवाय मृतकांमध्ये ६ रुग्ण हे नागपूर जिल्ह्याच्या बाहेरील आहेत. आज ५४ रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा ५ हजार ४३८ इतका झाला आहे.