नागपूर :राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या पुस्तकात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या काही खुलाशानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे कोणाच्याच पचनी पडले नसल्याची त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते आज नागपूरात पत्रकारांशी संवाद साधत होते.
ठाकरेंना पक्ष सांभाळता आला नाही :उद्धव ठाकरेंना त्यांचा पक्ष सांभाळता आला नाही. 40 आमदार त्यांना सोडून गेले आहेत. आताही लोक त्यांना रोज सोडून जात असल्याकडे बावनकुळे यांनी लक्ष वेधले. माविआचा गडगडाट झाला. त्यांच्या सभांना लोक येत नाहीत, आता त्यांना मंगल कार्यालयात वज्रमूठ बैठक घ्यावी लागेल अशी टीका बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर केली आहे.
बारसूची जनता ठाकरेंना येऊ देणार नाही : आज उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींवर आरोप करत आहेत, उद्धव ठाकरे आमच्यासोबत असताना मोदींची स्तुती केल्याचा रेकॉर्ड आमच्याकडे आहे. आता तुम्ही विरोधी पक्षाच्या लोकांसोबत गेल्याने तुम्हाला विरोध करायचा आहे, पण बारसूची जनता ठाकरेंना तिथे येऊ देणार नाही, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.