नागपूर - नागपुरातील गुन्हेगार कधी काय करतील याचा नेम राहिला नाही. आता तर एका चोरट्याने चक्क पोलीस ठाण्यात उभा असलेला चोरीचा ट्रक पळवला. महत्वाचे म्हणजे त्या ट्रकमध्ये २० टन लोखंड भरलेले होते. ही घटना शहरातील लाकडगंज पोलीस ठाण्यात घडली आहे. धक्कादायक म्हणजे, ज्या चोरट्याने पहिल्यांदा हा ट्रक चोरला होता, त्यानेच दुसऱ्यांदा हा ट्रक चोरला आहे. या घटनेमुळे पोलीस प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
सुमित पोद्दार या लोखंड व्यापाऱ्याचा २० टन लोखंड लादलेला ट्रक ९ ऑक्टोबर रोजी लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुष्करणा भवन समोरून चोरीला गेला होता. लाखोंचा मुद्देमाल भर रस्त्यातून चोरला गेल्यामुळे पोलिसांनी चारही दिशेने पथक रवाना केले होते. गुन्हे शाखेच्या पथकाने मोर्शीवरून ते ट्रक जप्त करून संजय ढोणे नावाच्या आरोपीला अटक केली होती. त्यानंतर तो जप्त केलेला ट्रक आणि आरोपी संजय ढोणे याला लकडगंज पोलीस ठाण्यात ताब्यात देण्यात आले होते.