नागपूर - संपूर्ण विदर्भात कोरोनाने हाहाकार माजवलेला आहे. आरोग्य यंत्रणा सपशेल अपयशी ठरत असल्यामुळे दरदिवशी कोरोना बधितांच्या मृत्यूचे आकडे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. गेल्या २४ तासात उपराजधानी नागपूर शहरात आणि जिल्ह्यात तब्बल १०१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसात नागपुरातील रुग्ण संख्या नियंत्रणात येण्याची चिन्ह दिसत असली तरी मृत्यूचे आकडे मात्र चिंता वाढवणारे आहेत. तर गेल्या २४ तासात ६ हजार २८७ जणांना कोरोनाची लागण झाली. तर ६ हजार 863 जणांना डिस्चार्ज मिळाला.
कोरोनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट ठरलेल्या नागपूर जिल्हात परिस्थिती अतिशय भीषण झालेली आहे. शासकीय आणि खासगी रुग्णालयात बेड मिळणे देखील अशक्य झाल्याने शेकडो रुग्ण शासकीय मेयो आणि मेडिकल रुग्णालयांच्या बाहेर ताटकळत आहेत. मात्र आरोग्य व्यवस्थाच अपुरी पडत असल्याने यंत्रणेचा नाईलाज झालेला आहेत. अशात रोज वाढणारी रुग्ण संख्या धोकादायक ठरत आहे. गेल्या २४ तासात नागपूर शहरात आणि जिल्ह्यात तब्बल ६२८७ रुग्णांना कोरोनाची लागण झालेली आहे. यामध्ये ३८१३ रुग्ण शहरातील आहेत. तर २ हजार ४६६ रुग्ण हे नागपूरच्या ग्रामीण भागातील आहेत. तर उर्वरित ८ रुग्ण बाहेरील आहेत. एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ७६ हजार ७२१ इतकी झाली आहे. आज (मंगळवारी) जिल्ह्यात २२ हजार ९०८ लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. ज्यामध्ये १७ हजार १५२ आरटीपीसीआर आणि ५७५६ अँटीजेन चाचण्यांचा समावेश आहे. आज (मंगळवारी) नागपूर शहरात आणि जिल्ह्यात तब्बल १०१ लोकांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतकांचा आकडा ६३८६ इतका झाला आहे.