नागपूर BJP And RSS Meeting : कायम इलेक्शन मोडवरचं असणाऱ्या भारतीय जनता पक्षानं आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केलीय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा पदाधिकाऱ्यांची सोमवारी नागपुरात महत्वपूर्ण बैठक पार (Important Meeting BJP And RSS) पडली. सुमारे सहा तास ही विशेष बैठक चालली आहे. विदर्भातील सर्वच लोकसभा मतदारसंघाचा आढावा या बैठकीत घेण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे. रविवारी पुण्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात लोकसभा मतदारसंघांच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला होता.
सर्व लोकसभा मतदारसंघाचा आढावा : नागपुरातील रेशीमबाग परिसरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरात सोमवारी सकाळपासून ही बैठक सुरू होती. या बैठकीत विदर्भातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आल्याची माहिती आहे.
बलस्थान आणि कमजोरीचा आढावा : प्रत्येक लोकसभेच्या क्षेत्रानुसार तिथले वर्तमान राजकीय समीकरण काय? भाजपाची स्थिती कशी आहे? निवडणुकांच्या अनुषंगानं भाजपाचं बलस्थान काय? कोणत्या कच्च्या दुव्यांकडं लक्ष द्यायचं आहे? यचा सखोल आढावा या बैठकीमध्ये घेण्यात आल्याची माहिती आहे.