नागपूर -भाजपची पालखी आयुष्यभर वाहणार नाही, असा शब्द बाळासाहेब ठाकरेंना दिल्याचा खुलासा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केला आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्यपालांच्या अभिभाषणानंतर केलेल्या भाषणात उध्दव ठाकरे यांनी हे वक्तव्य केले.
देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना 'तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचे वचन बाळासाहेबांना दिले होते का?' असा खोचक सवाल केला होता. त्यावर आज ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ठाकरे म्हणाले, "काँग्रेसच्या पाठिंब्याने शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार, असे वचन मी बाळासाहेबांना दिले नव्हते. पण, मी असे म्हणालो होतो की, भाजपची पालखी आयुष्यभर वाहणार नाही. भाजपचे ओझे वाहत होतो, ते आता खांद्यावरून उतरवले आहे”