नागपूर :शहरात आणखी एक खून झाल्याची नोंद पोलिसात झाली आहे. शहरातील वाडी भागातील त्रिशरण परिसरात एका संशयखोर पतीनं पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे.
चारित्र्यावरील संशय जीवावर बेतला : हत्येची ही घटना नागपूर शहराच्या वेशीवर असलेल्या वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाडी आंबेडकर नगर त्रिशरण चौक परिसरात घडली आहे. पत्नीचे अवैध संबंध असल्याच्या संशयावरून पतीनेच हे कृत्य केल्याचं पोलिसांनी सांगितलं. ही घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. पोलिसांनी लगेच तपासाला सुरुवात केली आहे. हे दोघे पती पत्नी गेल्या ५ वर्षांपासून त्रिशरण चौकातील एका घरात भाड्याने राहात होते. यातील पत्नीचं पहिलं लग्न आधीच एका मुलाशी झालं होतं. मात्र, ते दोघेही परस्पर वादामुळे वेगळे झाले होते. त्यानंतर २०१५ पासून हे दोघेजण एकत्र राहत होते. यातील पती दिवसभर चहाचे दुकान सांभाळत होता. त्यानंतर संध्याकाळी तो बाऊन्सर म्हणून काम करायचा. मात्र या दोघांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून रोजच वादा-वादी होत होती. यातील पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपीला होता. खून करण्यापूर्वी देखील याच विषयावरून दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. तेव्हा आरोपीने चाकूने तिच्या पोटात वार केले. ज्यामुळे तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यासंदर्भात शेजारी राहणाऱ्या लोकांनी ही माहिती लगेच वाडी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून आरोपीला अटक केली आहे. या दोघांचेही हे दुसरे लग्न असल्याने या प्रकरणातील गुंतागुंत वाढली आहे. पोलीस तपास करत आहेत.