नागपूर - बहीण भावाच्या पवित्र नात्याला आणखी घट्ट बंधनात बांधणारा सण म्हणजे रक्षाबंधन. हे नातं किती भावनिक असतं हे सांगण्यासाठी कोणत्याही साक्षपुराव्याची गरज नाही. रेशमी धाग्यात गुंफलेले हे नाते म्हणजे निस्वार्थ प्रेमाचे प्रतीक. यावर्षी २२ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. त्याकरिता बाजारात विविध प्रकारच्या आकर्षक राख्या उपलब्ध झाल्या आहेत. मात्र नागपूरकरांना भुरळ पडली आहे ती म्हणजे श्रद्धानंद अनाथालयातील लहान मोठ्या विद्यार्थ्यांनींनी तयार केलेल्या इको-फ्रेंडली राख्यांची. अतिशय सुबक आणि आकर्षक तितक्याच स्वस्त इको-फ्रेंडली राख्या श्रद्धानंद अनाथालयातील २० विद्यार्थिनी दिवस-रात्र एक करून इको-फ्रेंडली राख्या तयार करत आहेत. महत्वाचे म्हणजे गेल्या आठ दिवसांपासून सुरू झालेल्या या उपक्रमाअंतर्गत तयार झालेल्या दीड हजार राख्यांची विक्री सुद्धा झालेली आहे. निसर्गाचं सर्वधन ही थीम डोळ्यासमोर ठेऊन श्रद्धानंद अनाथालयातील विद्यार्थ्यांनींनी राख्या तयार करत आहेत.
श्रद्धानंद अनाथालयातील मुलींना जरी हक्काचा भाऊ नसला तरी एकमेकींच्या भावनिक नात्यात त्या गुंफल्या गेल्या आहेत. त्यांनी तयार केलेल्या राख्यांमध्ये तोच भाव आहे जो एक बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधताना असतो. समाज व्यवस्थेनुसार एक भाऊ बहिणीचा पाठीराखा समजला जातो त्याच प्रमाणे या विद्यार्थ्यांनी एकमेकींच्या सुख दुःखाच्या वाटेकरी आहेत. राखी तयार करण्याच्या उपक्रमात सुद्धा एकमेकींना सांभाळून घेत त्यांनी तब्बल दीड हजारांपेक्षा जास्त राख्यांची निर्मिती केली आहे. विषेश म्हणजे प्रत्येक राखीत प्रत्येक राखीत विविध झाडांचे सिड्स (बी) ठेवण्यात आले आहेत, ते सिड्स जमिनीवर पडल्यानंतर तिथे झाडं उगवणार अशी आशा या विद्यार्थ्यांनीना आहे.
राख्यांची ऑनलाईन विक्री जोरात-
नागपूरच्या श्रद्धानंद अनाथालयात सध्या राख्या तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे. अनाथालयातील मुली गेल्या काही दिवसांपासून राख्या तयार करण्याच्या कामात व्यस्त आहे. अत्यल्प साधन सामग्रीच्या मदतीने तयार करण्यात येत असलेल्या राख्यांची व्यवस्थित पॅकिंग करून त्याचे फोटो समाज माध्यमांवर पोस्ट होताच सर्व राख्यांची विक्री क्षणात होऊन जाते. त्यामुळे या विद्यार्थीनिंचा उत्साह द्विगुणित झाला आहे.